राजधानी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्या जामीनाच्या अर्जावर आणि मुख्य प्रकरणावर न्यायालयात सुनावणीही होत आहे. मात्र, अद्याप त्यांना दिलासा मिळालेला नसताना मनीष सिसोदियांनी तुरुंगातूनही सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातून समस्त देशवासीयांच्या नावे स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेलं एक पत्र समोर आलं असून त्यातून त्यांनी देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केलं पत्र!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांचं हे पत्र ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मनीष सिसोदिया यांच्या पत्रातील काही मुद्दे अधोरेखित केले आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकाही केली आहे.
काय आहे पत्रात?
मनीष सिसोदिया यांनी हिंदी भाषेत हे पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. “अपुरं शिक्षण घेतलेली व्यक्ती देशाचं नेतृत्व करू शकते का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. “आजचा युवक हा महत्त्वाकांक्षी आहे. त्यांना काहीतरी मिळवायचं आहे. त्यासाठी ते संधीच्या शोधात आहेत. त्यांना जग जिंकायची इच्छा आहे. त्यांना विज्ञान व तंत्रज्ञानात चमत्कार घडवायचे आहेत. एका कमी शिकलेल्या पंतप्रधानामध्ये आजच्या युवकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता आहे?” असा सवाल सिसोदियांनी विचारला आहे.
“आपण सध्या २१व्या शतकात जगत आहोत. जगभरात विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. पण जेव्हा मी आपल्या पंतप्रधानांना असं सांगताना ऐकतो की गटारात पाईप टाकून त्याच्या घाणेरड्या गॅसवर चहा किंवा जेवण बनवलं जाऊ शकतं, तेव्हा मला फार वाईट वाटतं. जेव्हा पंतप्रधान म्हणतात की ढगांच्या मागे उडणारी विमानं रडारला दिसू शकणार नाहीत, तर जगभरातल्या लोकांसाठी ते चेष्टेचा विषय ठरतात”, असं सिसोदिया यांनी पत्रात पुढे म्हटलं आहे.
“अपुरं शिक्षण ही गर्वाची बाब आहे का?”
“मी पंतप्रधानांचा एक व्हिडीओ पाहिला, ज्यात ते मोठ्या गर्वाने म्हणत आहेत की त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही. फक्त ग्रामीण भागातल्या शाळेपर्यंतच त्यांचं शिक्षण झालं आहे. अपुरं शिक्षण ही काय गर्व करण्याची बाब आहे का? आपण एखाद्या छोट्या कंपनीत मॅनेजरचा नियुक्ती करण्यासाठीही शिकलेली व्यक्ती शोधतो. मग देशाचा सगळ्यात मोठा मॅनेजर सुशिक्षित असायला नको का?”, असंही सिसोदियांनी पत्रात म्हटलं आहे.