दिल्लीतील शकूरबस्तीमध्ये रेल्वतर्फे करण्यात आलेल्या झोपडपट्या हटविण्याच्या कारवाईत एका सहा महिन्याच्या तान्हुल्याचा मृत्यु झाला. सदर घटनेची माहिती मिळताच तीन अधिका-यांना निलंबित केल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.


रेल्वे विभागाने शनिवारी शकूरबस्तीमधील ५०० झोपडपट्ट्या तोडल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला असून यात सहा महिन्याच्या चिमुरड्या बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.  केजरीवाल हे दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र सिंह यांच्यासह रात्री उशीरा घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्याठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी पीडितांसाठी ब्लँकेट आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यांनी अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई केल्याचा जोरदार विरोधही केला.  थंडीच्या काळात अशा प्रकारची कारवाई करणाऱ्याला देव कधीही क्षमा करणार नाही, असेही केजरीवाल म्हणाले. याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली असता संबंधित प्रकारणाबाबत ते अनभिज्ञ असल्याचे त्यांनी केजरीवालांना सांगितले.


त्या बाळाच्या मृत्यूचा आणि कारवाईचा संबंध नसल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केलेय. ज्यावेळी अधिकारी कारवाईसाठी पोहचले होते त्याआधीच एका झोपडीत बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. तसेच या झोपडपट्टी वासियांना अतिक्रमण हटवण्यासाठी नऊ महिन्यांपासून वारंवार नोटिसा देण्यात आल्याचे स्पष्टीकरण रेल्वे विभागाने दिले आहे.