देशातील शिक्षण व्यवस्थेवरुन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “भाजपा अशिक्षितांचा पक्ष आहे आणि देशालाही अशिक्षित ठेवतोय” असे ट्वीट सिसोदिया यांनी केले आहे. भाजपाशासित राज्यांमध्ये अनेक सरकारी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. भाजपाच्या राजवटीत मोठ्या प्रमाणात सरकारी शाळा का बंद पडत आहेत, याबाबत त्यांनी चौकशी करायला हवी, अशी मागणी सिसोदिया यांनी केली आहे.
CBI कारवाईनंतर केजरीवाल संतापले, न्यूयॉर्क टाइम्सचा फोटो केला ट्वीट, म्हणाले “जग कौतुक करत असताना…”
“२०१५ ते २०२१ या कालावधीत ७२ हजार शाळा बंद करण्यात आल्या आहेत. २०१८ ते २०१९ या केवळ एका वर्षाच्या कालावधीत तब्बल ५१ हजार शाळा बंद करण्यात आल्या. भाजपाशासित राज्यांमध्ये सरकारी शाळा बंद पडत असतानाच खाजगी शाळा भरभराटीला येत आहेत. या खाजगी शाळा भाजपाच्याच आमदारांनी बांधल्या आहेत”, असा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. जवळपास १२ हजार खाजगी शाळा सुरू करण्यात आल्याची माहितीही सिसोदिया यांनी दिली आहे. दिल्लीतील शाळांचा दर्जा खाजगी शाळांपेक्षा चांगला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
“दिल्लीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर त्यांनी चार वर्षांआधी छापेमारी केली होती. ४० आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यांना काहीही सापडले नाही. त्यानंतर तथाकथित उत्पादन शुल्क धोरण अनियमिततेप्रकरणी माझ्या घरावर सीबीआयने छापेमारी केली. मात्र, या कारवाईतूनही त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे त्यांनी आता आम्ही बांधलेल्या शाळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे”, असा आरोप भाजपावर सिसोदियांनी केला आहे.
दरम्यान, दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप सातत्याने आप नेत्यांकडून करण्यात येत आहे. आपच्या आमदारांना २० ते २५ कोटी रुपयांचे आमिष दाखवले जात आहे, असा दावा देखील पक्षाने केला आहे. भाजपामध्ये प्रवेश न केल्यास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लादलेल्या खोट्या खटल्यांना तोंड देण्यास तयार राहा, अशी धमकी मिळत असल्याचा आरोपही काही आप नेत्यांकडून करण्यात आला आहे.