Delhi Doctor Murder Case : जखमेवर मलमपट्टी करायला आलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी नर्सिंग होममधील एका डॉक्टरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीतून समोर आला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशीही केली. या चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५० वर्षीय डॉ. जावेद अख्तर यांच्या डोक्यात गोळी घालून अल्पवयीन मुलांनी त्याची हत्या केली. दिल्लीतील जैतपूर एक्स्टेंशनमधील निमा रुग्णालयात हा प्रकार घडलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी रुग्णालयातील नर्सवर प्रेम करत होता. डॉक्टरला मारल्यास मुलीशी लग्न करण्याची परवानगी देईन असं मुलीच्या वडिलांनी त्या अल्पवयीन मुलाला सांगितलं होतं.

नर्स आणि डॉक्टर यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय नर्सच्या पतीला होता.या संशयातूनच डॉक्टरची हत्या करण्याकरता नर्सच्या पतीने या अल्पवयीन मुलांना त्याला मारण्याची सुपारी दिली. आपल्या आवडत्या मुलीशी लग्न करायला मिळेल, या आमिषाने या मुलांनी डॉक्टरची हत्या केली, असं पोलिसांनी सांगतिलं. दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यांनुसार, मुलाने पतीच्या एटीएम खात्यातू पैसेही काढले होते. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा >> Doctor Murder : “शेवटी २०२४ मध्ये हत्या केलीच”, डॉक्टरच्या हत्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा गजाआड; सोशल मीडिया पोस्टही चर्चेत!

रुग्णालयात नेमकं काय घडलं होतं?

दोन अल्पवयीन मुले रुग्णालयात आले होते. त्यातील एकाच्या बोटाला जखम झाली होती. या जखमेवर रुग्णालयातील परिचारिकांनी ड्रेसिंग केली. ड्रेसिंग केल्यानंतर ही अल्पवयीन मुलं डॉक्टरांना भेटायला केबिनमध्ये गेली. तिथे त्यांनी डॉक्टरच्या डोक्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केबिनच्या दिशेने धाव घेतली. परंतु, तोवर अल्पवयीन मुलं पसार झाली होती. तसंच, डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. दरम्यान, त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावून घटनेची चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. तसंच, त्याची सोशल मीडिया पोस्टही चर्चेत होती. त्याने हत्या केल्यानतंर इन्स्टाग्रामवर फोटोसहित कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “शेवटी २०२४ मध्ये हत्या केली.”

पोलिसांनी केला होता टार्गेट किलिंगचा दावा

याप्रकरणी पोलिसांनी नर्सिंग होमच्या महिला परिचारिका आणि तिच्या पतीचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी आधीच म्हटलं होतं. सह पोलीस आयुक्त एसके जैन यांनी सांगितलं, ही हत्या एकाच परिसरात राहणाऱ्या दोन मुलांनी केलेली टार्गेट किलिंग होती. त्यापैकी एकाला हापूर येथून अटक करण्यात आली आहे. इतर आरोपीला पकडण्यासाठी पथके तैनात करण्यात आली असून तोही अल्पवयीन आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi doctor murder case you can our daughter if you kill doctor juvenile says sgk
Show comments