आम आदमी पार्टीनं दिल्लीत मिळवलेल्या विजयाचं शिवसेनेनं तोंडभरून कौतुक केलं असलं तरी याच शिवसेनेला दिल्लीत फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. दिल्लीत शिवसेनेच्या सगळ्याच उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली आहे. एका उमेदवाराला तर केवळ ११५ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. त्याच मतदारसंघात नोटाला मिळालेली मतं यापेक्षा जवळपास पाचपट आहेत.
”आपमतलब्यां’चा पराभव झाला. केजरीवाल यांच्या झाडूने सगळय़ांना साफ केले,” अशा शब्दांत शिवसेनेनं अरविंद केजरीवाल यांच्या विजयाचं सामनाच्या अग्रलेखातून कौतुक केलं आहे. याच शिवसेनेचे पाच शिलेदार दिल्लीत नशिब आजमावत होते. पण, या पाचही जणांवर जनतेनं पराभवाचा शिक्का मारला. हे पाचही उमेदवार डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुराडी मतदारसंघातून शिवसेनेकडून धरम वीर नावाचे उमेदवार लढत होते. त्यांना काही प्रमाणात जनतेचा पाठिंबा पाहायला मिळाला. धरम वीर यांना तब्बल १८ हजार ४४ मते मिळाली. ते बुराडी या मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर होते. बुराडीमध्ये आम आदमी पार्टीच्या संजीव झा यांचा मोठा विजय झाला.
शिवसेनेने करोल बाग मतदारसंघातून गौरव नावाचा उमेदवार दिला होता. त्याला तर १९२ मतेच मिळाली आहेत. याच ठिकाणी नोटाला ४४७ मते मिळाली आहेत. म्हणजेच शिवसेनेच्या उमेदवाराला या मतदारसंघात नोटाएवढेही मतं मिळू शकली नाहीत. या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या विशेष रवी यांचा विजय झाला. दुसऱ्या क्रमांकाची मतं भाजपाचा उमेदवाराला मिळाली.
चांदणी चौक मतदारसंघात अनिल सिंग जादोन यांना शिवसेनेनं आजमावलं. पण त्यांचाही काहीच करिष्मा दिसून आला नाही. अनिल सिंग यांना केवळं २४२ मतं मिळाली. या मतदारसंघातही शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा नोटाला मिळालेली मतं अधिक आहेत. नोटाला या मतदारसंघात २६३ मतं मिळाली आहेत.
विकासपुरी मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर संजय गुप्ता मैदानात होते. त्यांना ४२२ मतं मिळाली. येथेही नोटीची मतं शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या तुलनेत दुप्पट होती. नोटाला १०३४ मतं मिळाली आहेत.
शिवसेनेनं मालविया नगर येथून मोबिन अली यांना उमेदवारी दिली होती. त्यांनाही ११५ मतांवर समाधान मानावं लागलं. नोटाला त्यांच्यापेक्षा जवळपास पाचपट मतं मिळाली आहेत.