Delhi Election 2025 Arvind Kejriwal Big Announcement : दिल्ली विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शुक्रवारी (१७ जानेवारी) या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. भारतीय जनता पार्टीने शुक्रवारी दिल्लीकरांना आकर्षित करतील अशा अनेक घोषणांसह त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पाठोपाठ दिल्लीतल्या सत्ताधारी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी (१८ जानेवारी) एक मोठी घोषणा केली. केजरीवाल म्हणाले, “आम्ही दिल्लीकरांना आधीच वीज व पाणी मोफत देत आहोत. दुर्दैवाने दिल्लीत राहणाऱ्या भाडेकरूंना मात्र या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. मात्र, आता या भाडेकरूंनाही अशा सरकारी योजनांचा लाभ मिळायला हवा असं माझं मत आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यास आम्ही अशी योजना आणू, ज्याद्वारे दिल्लीत्लया भाडेकरूंनाही मोफत वीज व पाणी मिळेल”.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “सध्या दिल्लीतल्या नागरिकांना २०० युनिट्सपर्यंत मोफत वीज दिली जात आहे. तर २०० ते ४०० युनिट्सपर्यंत वापरलेल्या वीजेवर अर्धे शुल्क आकारले जात आहे. मात्र, विविध कारणांमुळे दिल्लीत राहणाऱ्या भाडेकरूंना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे, आता आमच्या सरकारने ठरवलं आहे की भाडेकरू देखील दिल्लीचे रहिवासी आहेत आणि त्यांनाही मोफत वीज व पाणी मिळायला हवं. मी प्रचारासाठी जिथे जिथे फिरतोय तिथे भाडेकरूंनी त्यांची ही मागणी माझ्यापर्यंत व आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
माजी मुख्यमंत्री म्हणाले, “दिल्लीतल्या सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुलं, त्यांची कुटुंबं दिल्लीचे रहिवासी आहेत. इथल्या भाडेकरूंची मुलं आपल्या सरकारी शाळांमध्ये शिकतात. आपण सुरू केलेल्या मोहल्ला क्लिनिकमध्ये (दवाखाने) व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेतात. डीटीसी बसमधून मोफत प्रवास करतात. वृद्धांना त्यांच्यासाठीच्या शासकीय योजना मिळतात. भाडेकरूंना या सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. मात्र त्यांना मोफत वीज व मोफत पाणी योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांना देखील मोफत वीज व पाणी योजनेचा लाभ मिळायला हवा यावर आम्ही सर्वजण ठाम आहोत”.
अरविंद केजरीवाल यांनी काही वेळापूर्वी समाजमाध्यमांद्वारे जाहीर केलं होतं की आज आम्ही (आम आदमी पार्टी) मोठी घोषणा करणार आहोत. त्यामुळे सर्वांचं त्यांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलं होतं. त्यांनंतर त्यांनी दिल्लीतल्या भाडेकरूंनाही मोफत वीज व पाणी देणार असल्याची घोषणा केली”.