Arvind Kejriwal defeated by BJP Parvesh Sharma : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आज (८ फेब्रुवारी) सुरु आहे. पुढील काही तासांत दिल्लीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघामधून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. अरविंद केजरीवाल यांचा पराभव हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, दुपारपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत भारतीय जनता पक्ष ४६ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २४ जागांवर आघाडीवर आहे. खरं तर दिल्लीच्या निवडणुकीत भाजपा आणि आम आदमी पक्षात मोठी चुरस पाहायला मिळाली. मात्र, या निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षाला नाकारल्याचं पाहायला मिळत आहे.

मनिष सिसोदिया यांचा पराभव

आम आदमी पक्षाचे मनिष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. मात्र, मनिष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे. तरविंदर सिंग मारवाह या ठिकाणाहून विजयी झाले आहेत. याआधी दोन निवडणुका मनिष सिसोदिया जिंकले होते. त्यांनी पटपडगंजमधून निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र सिसोदियांचा पराभव झाला आहे. त्यांना हरवणारे मारवा २०२२ भाजपात आले होते. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते तसंच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. मारवा हे भाजपाच्या शिख नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते आहेत.

प्रवेश वर्मा तातडीने अमित शाहांच्या भेटीला

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यानंतर भाजपाचे प्रवेश वर्मा हे तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीत भाजपाची सत्ता येणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे प्रवेश वर्मा यांच्यावर दिल्लीच्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

केजरीवालांच्या पराभवानंतर स्वाती मालीवाल यांची पोस्ट चर्चेत

‘आप’च्या या दारुण पराभवावर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया साइट ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. स्वाती मालीवाल यांनी एक फोटो पोस्ट करत म्हटलं की, “अहंकार रावण का भी नहीं बचा था…”, असं स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे. स्वाती मालीवाल यांच्या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Story img Loader