संपूर्ण देशाचे लक्ष्य लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे प्राथमिक कल हाती येऊ लागले आहेत. दिल्ली विधानसभेत पुन्हा आम आदमी पक्षाचे (आप) सरकार येईल, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल) व्यक्त केला होता. तसेच कल सकाळपासूनच्या मतमोजणीमध्ये दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आपच्या समर्थकांनी थेट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची पोस्टर्स झळकवली आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये “केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी” अशी लढत असेल अशा आशयाचे पोस्टर्स झळकल्याचे पहायला मिळाले.

दिल्लीतील आपच्या कार्यालयाबाहेर पक्षाचे कार्यकर्ते अरविंद केजरीवाल हे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील अशी पोस्टर्स झळकवताना दिसले. ‘2024: Kejriwal vs Modi’ असं यापैकी एका बॅनरवर लिहिण्यात आलं होतं.

 

दिल्ली निवडणूक: केजरीवाल विरुद्ध मोदी

दिल्ली विधानसभेची निवडणुकही केजरीवाल विरुद्ध मोदी अशीच झाल्याचे चित्र पहायला मिळाले. भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिलेला नव्हता. त्यामुळे मोदींच्या नावानेच भाजपाने ही निवडणूक लढवली. राष्ट्रवादापासून ते स्थानिक मुद्द्यांपर्यंत अनेक विषयांवरुन या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपा आणि आपमध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळालं. पूर्ण राज्याचा दर्जा नसणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने देशातील अव्वल नेत्यांना प्रचारामध्ये उतरवले होते.

२०१३ पासून मोदींचे प्रमुख विरोधक

२०१३ पासून केजरीवाल हे राजकीय पटलावर मोदींचे प्रमुख विरोधक म्हणून समोर येताना दिसत आहेत. २०१३ साली आपने पहिल्यांदाच दिल्लीमध्ये सत्ता स्थापन केली. त्यानंतर २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये केजरीवाल यांनी वाराणसीमधून भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये केजरीवाल पराभूत झाले होते. त्यानंतर केंद्रात मोदी सरकार सत्तेत असताना २०१५ साली आपने पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्ता काबीज केली. या निवडणुकीमध्ये केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपने ७० पैकी ६७ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला होता.

२०१९ ला दिली भाजपाला टक्कर

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपने भाजपाला दिल्लीतील सात मतदारसंघामध्ये कडवी झुंज दिली. दिल्लीमधील एकूण १८ टक्के मते आपने मिळवली होती. या निवडणुकीमध्ये भाजपाने दिल्लीतील सर्व सात जागा जिंकल्या होत्या. भाजपाला ५७ टक्के मते मिळाली.

Story img Loader