Delhi Election Result : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आज (८ फेब्रुवारी) सुरु आहे. पुढील काही तासांत दिल्लीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, दुपारी १२ वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीत भारतीय जनता पक्ष ४६ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २४ जागांवर आघाडीवर आहे. खरं तर भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षात जोरदार चुरस पाहायला मिळाली. दुपारपर्यंत समोर आलेला कल पाहता भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमत प्राप्त करेल असं चित्र पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर हा कल असाच राहिला तर दिल्लीत भाजपाचं सरकार येईल. त्यामुळे दिल्लीत भाजपाचा मुख्यमंत्री कोण होईल? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी माध्यमांशी बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठं भाष्य केलं आहे. वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटलं की, “आतापर्यंत निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे लागला. पण तरीही आम्ही अंतिम निकालाची वाट पाहत आहोत. दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल. नेमकं मु्ख्यमंत्री कोण असेल हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल”, असं वीरेंद्र सचदेवा यांनी स्पष्ट केलं आहे.

वीरेंद्र सचदेवा काय म्हणाले?

“भाजपाच्या उमेदवारांनी खूप परिश्रम केलं. दिल्लीच्या मतदारांनी विकास आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार निवडण्याला कौल दिला आहे. दिल्लीच्या जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व निवडलं आहे. कारण जनतेला देखील विकास हवा आहे. दिल्लीत नक्कीच डबल इंजिनचं सरकार स्थापन होईल. पण आम आदमी पक्षाने दिल्लीत खोटी आश्वासने दिले होते. आम्ही दिल्लीच्या वास्तविक मुद्द्यांवर निवडणूक लढवली. तुटलेले रस्ते, दारू धोरणाचा वाद, खराब पाणी आणि भ्रष्टाचार यासारख्या मुद्यांवर आम्ही आवाज उठवला आणि आपने दिलेले खोटे आश्वासने लोकांच्या समोर आणले. आम्ही त्यांना त्यांच्या आश्वासनाबाबत विचारलं तेव्हा ते गप्प राहिले. त्यांनी खोटी आश्वासने देऊन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. पण दिल्लीतील जनतेने भाजपाचा संघर्ष समजून घेत परिवर्तनाला मतदान केलं”, असं वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांचा पराभव

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आज (८ फेब्रुवारी) सुरु आहे. पुढील काही तासांत दिल्लीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघामधून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पराभव हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मनिष सिसोदिया यांचा पराभव

आम आदमी पक्षाचे मनिष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तरविंदर सिंग मारवाह या ठिकाणाहून विजयी झाले आहेत. याआधी दोन निवडणुका मनिष सिसोदिया जिंकले होते. त्यांनी पटपडगंजमधून निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र सिसोदियांचा पराभव झाला आहे. त्यांना हरवणारे मारवा २०२२ भाजपात आले होते. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते तसंच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. मारवा हे भाजपाच्या शिख नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते आहेत.