Sanjay Raut On Delhi Election Result : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज केली जात आहे. ही निवडणूक इंडिया आघाडीमधील काँग्रेस आणि आप या पक्षांनी स्वतंत्रपणे लढली होती. दरम्यान आज सुरू असलेल्या या मतमोजणीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. दिल्लीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असे चित्र दिसत आहे. यादरम्यान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रात वाढलेल्या मतांबद्दल मोठं भाष्य केलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
काल (शुक्रवार) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबरोबर एक पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील महाराष्ट्रात वापरलेला पॅटर्न राबवला गेला असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, “मी कालच दिल्लीत राहुल गांधी यांच्याबरोबर जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये स्पष्ट केलं होतं की , दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू केला आहे. ज्यापद्धतीने महाराष्ट्रीत विजय मिळवला आणि त्यासाठी लोकशाहीतील घृणास्पद कृत्य महाराष्ट्रात घडवून आणली, त्याला एक्सपोज राहुल गांधी यांनी केले.”
“लोकसभा आणि विधानसभा यामधील पाच महिन्यांच्या काळात ३९ लाख मते वाढली. प्रौढ मतदारांचा आकडा आहे त्यापेक्षा जास्त मतदान झालं आहे. हे मतदान आलं कुठून. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदारांचा जो आकडा दिला आहे त्यापेक्षा साधारण ४० लाख मतदान जास्त झालं असेल आणि त्याचा हिशोब निवडणूक आयोग देत नाही, मतदार याद्या देत नाही. हाच पॅटर्न दिल्लीत राबवला गेला. याच पॅटर्नने त्यांना महाराष्ट्रात यश मिळालं”, असेही संजय राऊत म्हणाले.
फॉर्म्युला ठरलेला आहे
राऊत पुढे बोलताना म्हणाले की, “प्रत्येक मतदारसंघात (महाराष्ट्रातील) १५ ते २० हजार मते वाढवण्यात आले. काल मला विचारण्यात आलं की ही ३९ लाख मतं आली कुठून आणि जाणार कुठे? त्यातील काही बोगस मतदार दिल्लीत वळवले आणि त्यानंतर ३९ लाख मते तशीच्या तशी बिहार निवडणुकात जातील. फॉर्म्युला ठरलेला आहे,”