Anna Hazare on Delhi Election Result : दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज (८ फेब्रुवारी) मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षात जोरदार लढत पाहायला मिळाली. आप दिल्लीत चौथ्यांदा सत्तेत येणार का? अशी उत्सुकता लागली होती. मात्र निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या कलानुसार भारतीय जनता पक्ष विजयी होताना दिसत आहे. यादरम्यान सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या निवडणूक निकालाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
अण्णा हजारे काय म्हणाले?
निवडणूक लढवताना उमेदवारामध्ये कोणते गुण असणे आवश्यक असते याबद्दल अण्णा हजारे यांनी भाष्य केले. हजारे म्हणाले की, “मी आधीच सांगितलंय की, निवडणूक लढताना उमेदवारामध्ये आचरण, विचार शुद्ध असणे, जीवन निष्कलंक असणे, जीवनात त्याग असणे हे गुण जर असतील तर मतदारांना विश्वास वाटतो की आपल्यासाठी कोणीतरी करणारा आहे. मी वेळोवेळी सांगत आलो पण त्यांच्या डोक्यात ते आलं नाही.”
“दारूच्या बाबतीत त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला…की दारूचे दुकान…हा दारूचा मुद्दा का उपस्थित झाला तर पैसा आणि संपत्ती… यामध्ये ते वाहून गेले,” असे अण्णा हजारे पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
डोक्यात दारूचे विचार शिरले आणि…
आपच्या पराभवाच्या पराभवाच्या कारणांबद्दल माध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले की, “हे (आप) डाऊन झाले याला कारण आहे. दारूचे दुकानं काढायचे, दारूचे परमीट द्यायचे हे विचार जेव्हा यांच्या डोक्यात शिरले त्यावेळेला हे डाऊन झाले. जागरूक मतदार हे लोकशाहीचा आधार आहे आणि आजचा मतदार जागरूक झाला आहे. त्याने पाहिलं की हे सगळा दारूचा विचार करतात, त्यामुळे त्याने नकार दिला.”
पुढे बोलताना हजारे म्हणाले की, “हे जेव्हा माझ्याबरोबर आले त्यावेळेला मी त्यांना सुरूवातीपासून सांगत आलो की जनतेचे सेवा करा. सेवेता अर्थ निष्काम कर्म… फळाची अपेक्षा न करता केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते, अशी पूजा तुम्ही करत रहा तुम्हाला कोणी हटवणार नाही. सुरुवातीला बरं वाटलं… नंतर यांच्या डोक्यात दारूचे दुकान शिरले… दारूचे लायसन्स शिरले आणि घोटाळा झाला. दारू डोळ्यासमोर आली की पैसा , धन, दौलत आली, मग सगळं बिघडलं आणि त्यामुळे जनतेने त्यांना जो कौल दिला तो बरोबर दिला. की असे वागत असलेले लोक सत्तेवर आले तर देश, दिल्ली बरबाद होईल म्हणून त्यांना नकार दिला.”
भाजपाची मोठी आघाडी
दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज (८ फेब्रुवारी) रोजी मतमोजणी केली जात आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीतील सहकारी पक्ष काँग्रेस आणि आप हे स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. या निवडणुकीत भाजपा आणि आप यांच्यात अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. यादरम्यान दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दिल्ली विधानसभा निवडणूक मतमोजणीत ४५ जागांवर भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचे दिसून आले. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने २५ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसला दिल्लीतील एकाही जागेवर आघाढी घेता आली नाही.