दिल्ली विधानसभेवर पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा झेंडा फडकणार आहे असं चित्र दिसत आहे. निकालाचे प्राथमिक कल हाती येऊ लागले आहेत. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर आज जाहीर होणाऱ्या निकालांमध्ये प्रमुख लढत ही भाजपा आणि अरविंद केजरीवाल यांच्या आपमध्ये आहे. या लढतीमध्ये आपने बाजी मारल्याचे प्राथमिक कलांमधून दिसत आहे. पहिल्या तीन तासांच्या मतमोजणीनंतर आप ५० जागांवर तर भाजपा २० जागांवर आघाडीवर आहे. या निकालामुळे दिल्लीच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन झुगारुन लावत आपल्या पारड्यात मत दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
काय म्हणाले होते मोदी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ४ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या सभेमध्ये “दिल्लीला दोष देणारे नव्हे, तर दिशा देणारे सरकार हवे आहे,” असं सांगत सत्ताधारी आपवर टीका केली होती. पश्चिम दिल्लीतील द्वारका भागात घेतलेल्या जाहीर सभेत मोदींनी, “‘सब का साथ सब का विकास’चा अर्थ समजणारे सरकार दिल्लीत स्थापन झाले पाहिजे,” असं आवाहन मतदारांना केलं होतं. मात्र दिल्लीकरांना मतपेटीमधून पुन्हा एकदा आपच्याच बाजूने मतदान केल्याचे चित्र प्रथामिक कलांमधून स्पष्ट झालं आहे.
दिशा देणारे सरकार हवे
दिल्लीला दिशा देणारे सरकार सत्तेत यायला हवं असं मत यावेळेस मोदींनी व्यक्त केलं होतं. “दिल्लीमध्ये होणारी विधानसभा निवडणूक ही नव्या दशकातील पहिली निवडणूक आहे. भारताच्या विकासाची मोहोर उमटवणारे हे दशक असेल. देशाची प्रगती आज घेतल्या गेलेल्या निर्णयांवर अवलंबून असून एका बाजूला सकारात्मक निर्णय घेणारे केंद्र सरकार आहे, तर दुसऱ्या बाजूला निर्णयांना विरोध करणारे पक्ष आहेत. म्हणूनच दिल्लीला दोष देणारे नव्हे, तर दिशा देणारे सरकार हवे,” असं मोदी म्हणाले होते.
अशा सरकारची गरज नाही
केंद्राच्या योजनांचा लाभ आप सरकारमुळे दिल्लीकरांना घेता येत नाही असा आरोप मोदींनी आपल्या भाषणामध्ये केला होता. “केंद्राच्या योजनांचा लाभ दिल्लीकरांना मिळू न देणाऱ्या सरकारची दिल्लीकरांना गरज नाही. ‘सब का साथ सब का विकास’चा अर्थ समजणारे सरकार दिल्लीत स्थापन झाले पाहिजे. पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणाऱ्या आयुष्मान विमा योजनेपासून वंचित राहणाऱ्या दिल्लीतील गरीब जनतेचा काय दोष आहे, पंतप्रधान आवास योजनेतून घर न मिळू शकणाऱ्या बेघरांचा काय दोष आहे, सामान्यांच्या विकासात अडथळा निर्माण करणारे सरकार दिल्लीकरांना अपेक्षित नाही,” असे म्हणत मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शरसंधान साधले होते.
भाजपावर विश्वास दाखवा
भाजपावर विश्वास दाखवा असं आवाहनही मोदींनी आपल्या प्रचारसभेत केलं होतं. केंद्राच्या योजना दिल्ली सरकारने लागू केलेल्या नाहीत याबद्दल मोदींनी केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. “लोकसभा निवडणुकीत दिल्लीकर मतदारांनी भाजपवर विश्वास ठेवला. त्यामुळेच स्वाभिमानी दिल्लीकर म्हणतात की, देश बदलला आता दिल्लीही बदलू. हा नारा आणण्यासाठी भाजपवर विश्वास दाखवा”, असे आवाहन मोदींनी केले होते.