दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकालाचे प्राथमिक कल हाती येऊ लागले आहेत. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर आज जाहीर होणाऱ्या निकालांमध्ये प्रमुख लढत ही भाजपा आणि अरविंद केजरीवाल यांच्या आपमध्ये असल्याचे चित्र प्राथमिक कलांमधून स्पष्ट होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या दोन तासांच्या म मतमोजणीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने ५२ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर १८ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी लागणारा ३६ जागांचा आकडा आप सहज गाठेल असं चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आपच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. असं असलं तरी केजरीवाल यांनी निकाल हाती येऊन विजयाची औपचारिक घोषणा होण्याआधीच आपच्या कार्यकर्त्यांना एक आवाहन केलं आहे.

दिल्ली विधानसभेत पुन्हा आम आदमी पक्षाचे (आप) सरकार येईल, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल) व्यक्त केला आहे. सहा मतदानोत्तर चाचण्यांचे सरासरी कौल शनिवारी मतदानाची वेळ संपल्यानंतर जाहीर केले. या सर्व चाचण्यांचे कौल ‘आप’च्या बाजूने झुकले असून एकूण ७० जागांपैकी ‘आप’ला ५० ते ५५ तर, भाजपला १५-२० जागा आणि काँग्रेसला दोन जागा मिळतील असा या चाचण्यांचा अंदाज आहे.

काय म्हणाले केजरीवाल?

आपचा विजय होणार असं एक्झिट पोलने स्पष्ट झाल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारपासूनच जल्लोषाची तयारी सुरु केली. मात्र अरविंद केजरीवाल यांनी विजयाचा जल्लोष साजरा करताना फटाके फोडू नका असं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. फटके फोडल्याने प्रदुषण होते त्यामुळेच फटाके फोडणे टाळावे असं केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. सोमवार संध्याकाळपासून दिल्लीमधील आपच्या कार्यालयामध्ये निवडणुकीच्या विजयाची तयारी सुरु झाली. आयटीओ येथील आपच्या कार्यालयामध्ये काल संध्याकाळपासून मिठाईचे पुडे आणि इतर पदार्थ मागवण्यात आले.

केजरीवाल २० हजार मतांनी आघाडीवर

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पहिल्या दोन तासांच्या मतमोजणीमध्ये केजरीवाल यांनी तब्बल २० हजार मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघातून त्यांच्याविरोधात भाजपानं सुनील कुमार यादव, तर काँग्रेसनं रोमेश सबरवाल यांना मैदानात उतरवलं आहे.

६७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी शनिवारी ६२.५९ टक्के मतदान झाले. ६७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात विलंब झाल्याने ‘आप’ने निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते.