दिल्ली विधानसभेत पुन्हा आम आदमी पक्षाचे (आप) सरकार येईल, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल) व्यक्त केला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या अर्ध्या तासामध्ये हाती आलेल्या प्राथमिक कलांनुसार ४३ जागांवर अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष आघाडीवर आहे. तर १३ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. त्यामुळेच एक्झिट पोलने व्यक्त केलेला अंदाज खरा होत असल्याचे चित्र प्राथमिक कलांमध्ये दिसत आहे. आप बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या ३५ जागांच्या आकड्यापर्यंत सहज मजल मारेल असंच सध्या दिसत आहे.
मतदानोत्तर चाचण्यांचे सरासरी कौल शनिवारी मतदानाची वेळ संपल्यानंतर जाहीर केले. या सर्व चाचण्यांचे कौल ‘आप’च्या बाजूने झुकले असून एकूण ७० जागांपैकी ‘आप’ला ५० ते ५५ तर, भाजपला १५-२० जागा आणि काँग्रेसला दोन जागा मिळतील असा या चाचण्यांचा अंदाज आहे.
‘आप’ला २०१५ मध्ये ६७ जागा मिळाल्या होत्या. भाजपला जेमतेम तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. चाचण्यांचा सरासरी कौल खरा ठरला तर ‘आप’ला गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही बहुमत मिळेल. बहुमतासाठी ३६ जागांची गरज आहे, पण ‘आप’च्या १२-१५ जागा कमी होऊ शकतात. ‘आप’ने ‘६७ पार’ असे लक्ष्य ठेवले होते. मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजपने आक्रमक प्रचार करून ‘आप’पुढे आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे भाजपच्या जागांमध्ये भर पडण्याची शक्यता असून गेल्या वेळेपेक्षा १२-१७ जागा जास्त मिळू शकतील. पाच वर्षांपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हाती शून्य आले होते. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक असल्याचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज सांगतात.
‘आप’ला २०१५ मध्ये ५४.०३ टक्के, भाजपला ३२ टक्के आणि काँग्रेसला फक्त ९.६ टक्के मते मिळाली होती. भाजपच्या जागा वाढल्या तर या पक्षाच्या मतांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. ‘आप’ने संपूर्ण निवडणूक प्रचारात विकासकामांची जंत्री मतदारांपुढे सादर केली होती. मुख्यत्वे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामांना मतदारांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. ‘आप’ने शिक्षण हाच प्रचारातील प्रमुख मुद्दा बनवल्यानंतर भाजप आणि काँग्रेसलाही त्यांच्या जाहीरनाम्यात शिक्षणाचा समावेश करावा लागला होता. मात्र प्रचाराच्या शेवटच्या दोन आठवडय़ांत भाजपने सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला लक्ष्य केले. दिल्लीतील आंदोलनाचे केंद्र ठरलेला ‘शाहीन बाग’ मुद्दा प्रमुख बनवत आप आणि काँग्रेसने ‘देशद्रोहा’ला खतपाणी घातल्याचा आरोप भाजपने केला होता.
मतदानात १० टक्के घसरण!
७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी शनिवारी ६२.५९ टक्के मतदान झाले. ६७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. २०१५ मध्ये ६७.०८ टक्के मतदान झाले होते. राजधानीतील मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये मात्र सरासरीपेक्षा जास्त मतदान झाले. मुस्तफाबाद, मतिया महल, सिलमपूर या मतदारसंघांमध्ये अनुक्रमे ६६.२९ टक्के, ६५.६२ टक्के आणि ६४.९२ टक्के मतदान झाले. विधानसभेच्या ७० जागांसाठी सुमारे ७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले होते. केजरीवाल यांनी विशेषत: महिला मतदारांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले होते. सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले. दिवसाच्या पूर्वार्धात मतदान संथगतीने झाले. नंतर मात्र वेग वाढत गेला. तरीही शनिवारी आठवडय़ाच्या अखेरच्या दिवशी मतदानासाठी गेल्या वेळच्या तुलनेत कमी संख्येने मतदार बाहेर पडले. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जामिया आणि शाहीन बाग येथे आंदोलन सुरू असल्याने ओखला मतदारसंघात येणारे हे दोन्ही परिसर संवेदनशील घोषित करण्यात आले होते. शाहीन बाग परिसरातील पाचही मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या केंद्रांवर शांततेत मतदान झाले.
जागांचा सरासरी अंदाज
आप : ५०-५५ भाजप : १५-२० काँग्रेस : ०-२
निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो.
एक्झिट पोल कधी जाहीर केला जातो?
एक्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो.
कशा पद्धतीने घेतला जातो एक्झिट पोल?
एक्झिट पोल हा ज्यादिवशी मतदान होते म्हणजे मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणार पंधरावा, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्व्हे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.
एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक?
ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. ओपिनियन पोल मतदानापुर्वी सादर केला जातो. मतदान होण्यापुर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ओपिनियन पोल तयार केला जातो.
ओपनियन पोलवर कितपत अवलंबून राहू शकतो?
एक्झिट पोल आणि ओपनियन पोलमधील मुख्य फरक म्हणजे एक मतदानाआधी आणि एक मतदानानंतर घेतला गेलेला असतो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतला गेला असल्याने तो बदलण्याची शक्यता असते. त्याचे अंदाज बदलू शकतात. पण एक्झिट पोल हा मतदान घेतल्यानंतरचा असल्याने त्याच्यावर निर्भर राहू शकतो.
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली?
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली यामध्ये मतांतर आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.