दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकालाचे जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. सकाळी मतमोजणी सुरु झाल्यापासूनच आपने घेतलेली आघाडी कायम ठेवली आहे. आठ तासांच्या मतमोजणीनंतर आप ५३ जागांवर आघाडीवर आहे तर भाजपा सात जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे मागील दीड महिन्यापासून चर्चेत असणारा शाहीन बाग मतदारसंघ ज्या परिसरामध्ये आहे त्या ओखला मतदारसंघामध्ये भाजपाच्या उमेदवारचा पराभव झाला असून आपच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे.

ओखला मतदारसंघामधून आम आदमी पक्षाचे उमेदवार अमानतुल्ला खान यांनी ७० हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. दुपारी एकच्या सुमारास खान यांनी मतमोजणीच्या १३ व्या फेरीमध्ये ७० हजारहून अधिक मतांनी आघाडी मिळवली होती.

 

२०१५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्येही अमानतुल्ला यांनीच या मतदारसंघामधून विजय मिळवला होता. मागील दोन महिन्यांपासून शाहीन बाग परिसरामध्ये सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात आंदोलन सुरु आहे. भाजपाने दिल्ली निवडणुकांमध्ये शाहीन बाग हा मुख्य मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला होता. अनेक वृत्तवाहिन्यांच्या चर्चा सत्रांमध्ये भाजपाचे नेते याच मुद्द्यावर चर्चा करताना दिसत होते.

आठ वाजता मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या तासामध्ये आपने ५३ जागांवर आघाडी मिळवल्याचे चित्र दिसत असून बहुमताचा ३६ जागांचा आकडा आप सहज पार करेल असं चित्र सकाळपासून होतं. संध्याकाळी पाच नंतरही हेच चित्र कायम दिसत असून आप सलग तिसऱ्यांदा दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे सरासरी कौल शनिवारी मतदानाची वेळ संपल्यानंतर जाहीर केले. या सर्व चाचण्यांचे कौल ‘आप’च्या बाजूने झुकले असून एकूण ७० जागांपैकी ‘आप’ला ५० ते ५५ तर, भाजपला १५-२० जागा आणि काँग्रेसला दोन जागा मिळतील असा अंदाज या चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला होता. हा अंदाज अगदी योग्य असल्याचेच दिसून आले आहे.