देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या दिल्लीच्या निवडणुकांचे आज निकाल जाहीर होणार आहेत. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर आज जाहीर होणाऱ्या निकालांमध्ये प्रमुख लढत ही भाजपा आणि अरविंद केजरीवाल यांच्या आपमध्ये असणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र त्याआधीच म्हणजेच सोमवारीच आपचे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्यास आश्चर्य वाटणार नाही असं मत व्यक्त केलं आहे.

“दिल्लीचे जनमत भाजपाच्या बाजूने आहे. आम्ही प्रत्यक्ष काम करत असल्याने आम्हाला सत्य ठाऊक आहे. त्यामुळेच नवी दिल्ली मतदारसंघामधून अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही,” असं मत मिश्रा यांनी व्यक्त केलं आहे. “आपकडून निवडणूक आयोग आणि इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे धोकादायक आहे. आपला दिल्लीतील जनतेच्या मनात काय आहे याची चाहूल लागली असल्याने आता ते असे प्रश्न उपस्थित करत आहेत. दिल्लीमध्ये भाजपाचा विजय होणार असून भाजपाच सत्तेत येणार आहे,” असा विश्वासही मिश्रा यांनी व्यक्त केला आहे.

२०१९ मध्ये ऑगस्ट महिन्यात दिल्ली विधानसभेची सदस्यता रद्द करण्यात आल्यानंतर व अपात्र घोषित करण्यात आल्यानंतर मिश्रा यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आणि विजय गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी भापजपाची प्राथमिक सदस्यता स्वीकारली होती. विधानसभेची सदस्यता रद्द करण्यात आल्यानंतर कपिल मिश्रा यांनी, मोदींसाठी एकदा नाही तर शंभरवेळा खुर्ची सोडण्यास तयार असल्याचे म्हटले होते.

Story img Loader