दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी सायंकाळी साडेपाच पर्यंत ६६ टक्के मतदारांनी हक्क बजावला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणावर मतदान झाल्याने ‘सत्ताविरोधी लाट आली’ हा पारंपरिक समज यंदाही खरा होण्याची शक्यता आहे. वाढलेली टक्केवारी जशी ऐतिहासिक आहे तशीच भाजप व काँग्रेसव्यतिरिक्त आम आदमी पक्षाच्या रूपाने तिसरा पर्याय दिल्लीकरांसमोर आला, तोदेखील पहिल्यांदाच. याशिवाय निवडणूक आयोगाने जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला होता. इतकेच नव्हे तर फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अप यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातूनदेखील प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचारात आघाडी घेतली.
सन १९९३ साली झालेल्या निवडणुकीत एकूण ६१.७५ टक्केमतदान झाले होते. त्या वेळी भारतीय जनता पक्षाने मदनलाल खुराना यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली. पाच वर्षांच्या कालावधीत भाजपने तीन मुख्यमंत्री बनवले. १९९६ साली साहेबसिंह वर्मा तर १९९८ साली सुषमा स्वराज यांच्या हाती नेतृत्व देण्यात आले. दिल्लीत कधीही सत्तासंचालनाचा अनुभव नसल्याने नवखेपणातच हरखून गेलेल्या भाजपला १९९८ साली काँग्रेसने पराभूत केले.
१९९८ साली ४८.९९ टक्के मतदान झाले व शीला दीक्षित यांनी सत्ता स्थापन केली. २००३ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढून ५३.४२ टक्क्य़ांपर्यंत पोहोचली व शीला दीक्षित दुसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. २००८ मध्ये ५७.५८ टक्के मतदारांनी मतदान करून पुन्हा शीला दीक्षित यांनाच संधी दिली. १९९३ ते २००८ या कालावधीत झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सरासरी तीन ते चार टक्क्यांनी वाढली. यंदा मात्र मतदारराजाने सारेच रेकॉर्ड ब्रेक केले. विशेष बाब म्हणजे २००८ साली काँग्रेस व भाजपला मिळालेल्या एकूण मतांमध्ये चार टक्क्यांचा फरक होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा