Congress Launches Pyari Didi Yojana Amide Delhi Elections : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेस पक्षाने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. या आगामी निवडणुकीपूर्वी दिल्लीतील महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने निवडणुकीत विजय मिळाल्यास आपण ‘प्यारी दीदी’ योजनेअंतर्गत (Pyari Didi Yojana) प्रत्येक महिलेला २,५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सोमवारी या योजनेचे घोषणा केली, याबरोबरच त्यांनी काँग्रेस दिल्लीमध्ये विजय मिळवेल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. “आम्ही सत्ता स्थापन केल्याबरोबर लगेच ही योजना लागू करू आणि ज्याप्रकारे कर्नाटकमध्ये दिले तसेच महिलांना २,५०० दिले जातील”, असे शिवकुमार यावेळी म्हणाले. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव, दिल्ली काँग्रेसचे प्रभारी काझी निझामुद्दीन आणि इतर प्रमुख नेते या घोषणेवेळी उपस्थित होते.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पाठोपाठ निवडणुकीच्या तोंडावर आता काँग्रेसने देखील महिलांसाठी योजना जाहीर केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजना’ (Mukhya Mantri Mahila Samman Yojna) जाहीर केली आहे, ज्यामध्ये निवडणुकीनंतर महिलांना दर महिना दिली जाणारी आर्थिक मदत १,००० रूपयांवरून २,१०० केली जाईल असे आश्वासन दिले आहे. ही रक्कम निवडणुका झाल्यानंतर महिलांच्या खात्यात जमा केली जाईल असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
आपने जाहीर केलेल्या या योजनेच्या माध्यमातून १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला, ज्या दिल्लीतील मतदार आहेत यांना लक्ष्य केले जात आहे. या योजनेत सध्याच्या किंवा माजी कायमस्वरूपी सरकारी नोकरदार, खासदार, आमदार, नगरसेवक आणि ज्यांनी गेल्या आर्थिक वर्षात आयकर भरला आहे अशा महिलांना वगळण्यात आले आहे. या योजनेचा २२ लाखांहून अधिक महिलांना लाभ होईल असा आपचा दावा आहे.
हेही वाचा >> Sensex Today: शेअर बाजारात पडझड, गुंतवणूकदार हवालदिल; १२०० अंकांनी सेन्सेक्स कोसळला!…
दिल्लीतील आप सरकार दर महिना २०० युनिटपर्यंत वीज वापरणार्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज देत आहे. तसेच २०१ ते ४०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना ५० टक्के सबसिडी दिली जात आहे. याबरोबरच दर महिना २० हजार लिटर पाणी देखील मोफत दिले जात आहे.
इतके उमेदवार जाहीर
दिल्ली विधानसभा निवडणूक जवळ येत असून येत्या फेब्रुवारी महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत काँग्रेसने ७० मतदारसंघांसाठी ४७ उमेदवार जाहीर केले आहेत. तर आपने त्यांचे सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने देखील त्यांची पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, भाजपाने केजरीवाल यांच्या विरोधात परवेश वर्मा यांना केजरीवाल यांच्याविरोधात संधी देण्यात आली आहे.