दिल्लीकर मतदारांनी भाजपचा ध्रुवीकरणाचा प्रयत्न फोल ठरवत आम आदमी पक्षाच्या (आप) विकासाच्या धोरणाला एकतर्फी कौल दिला. लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस मते देणाऱ्या दिल्लीने विधानसभेत मात्र सलग तिसऱ्यांदा ‘आप’ला निवडून दिले. ‘आप’च्या या लाटेत भाजपचा धुव्वा उडाला तर काँग्रेसच्या हाती पुन्हा एकदा भोपळा आला आहे. या पराभवामुळे मागील दोन वर्षांमध्ये भाजपाचा पराभव झालेल्या राज्यांच्या यादीत दिल्लीचाही समावेश झाला आहे. दोन वर्षात एक दोन नाही तर तब्बल सहा राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांचा निवडणूक विजयाचा करिष्मा ओसरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
दिल्लीमध्ये भाजपाला २०१५ मध्ये अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे यंदा भाजपाला दिल्लीमध्ये चांगले यश मिळेल अशी अपेक्षा पक्षाच्या नेत्यांना होती. दिल्लीचे भाजपाचे प्रमुख मनोज तिवारी यांनी तर भाजपाला ४८ जागांवर विजय मिळेल असं भाकित वर्तवलं होतं. मात्र मतदारांनी सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या सत्तेच्या चाव्या केजरीवाल यांच्या हाती दिल्या. या पराभवामध्ये आता भाजपाविरोधी पक्षांचे सरकार असणाऱ्या राज्यांची संख्या १२ झाली आहे. देशात १६ राज्यांमध्ये भाजपा आणि मित्र पक्षांचे सरकार सत्तेत आहेत. देशातील ४२ टक्के लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे.
सात राज्यांमध्ये काँग्रेस</strong>
सध्या देशामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, पॉण्डेचेरी आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची एकहाती किंवा मित्रपक्षांबरोबर युतीमध्ये सत्ता आहे. डिसेंबर महिन्यामध्ये काँग्रेसने मित्रपक्षाच्या मदतीने झारखंडमध्येही सत्ता स्थापन केली आहे. झारखंडमधील सत्ता स्थापनेनंतर देशातील काँग्रेसशासित राज्यांची संख्या सात झाली आहे.