राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांची धामधुम असून आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा या तीन मुख्य पक्षांमध्ये लढत होणार आहे. सत्तारुढ ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाने कंबर कसल्याचे दिसतेय. तर पुन्हा सत्तेत येण्यासाठी केजरीवालांचा ‘आप’देखील जोर लावतोय. पण, अचानक दिल्लीच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा सुरू झाली आहे. कारण, आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते  राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.


विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दिल्लीत आमदारांची बंडखोरी पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे विद्यमान आमदार फतेह सिंह आणि कमांडो सुरिंदर सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे निरीक्षक के.के शर्मा आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी याबाबत घोषणा केली. दोन्ही आमदारांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असल्याची भावना व्यक्त केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. तर, राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या दोघांचेही स्वागत करताना ‘दिल्ली अभी दूर नहीं’ अशी प्रतिक्रिया ट्विटरद्वारे दिली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा उमेदवारी नाकारल्याने फतेह सिंह आणि सुरिंदर सिंह नाराज होते. आपने 70 उमेदवारांची यादी जाहीर करताना, 15 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं. त्यात फतेह सिंह यांच्या ऐवजी चौधरी सुरेंद्र कुमार यांना आपने उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज फतेह सिंह यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. फतेह सिंह यांनी गोकलपुर तर सुरिंदर सिंह यांनी दिल्ली- कँटॉन्मेंट येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिल्लीत आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे, तर 11 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

Story img Loader