नवी दिल्ली : कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस जिल्हा न्यायालयाने सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली. त्यामुळे आम आदमी पक्षाला जबरदस्त दणका बसला असून या अटकेविरोधात निदर्शने करण्यासाठी ‘आप’चे कार्यकर्ते तिहार तुरुंगाबाहेर जमा झाले होते.
या घोटाळयात तिहार तुरुंगात कैद असलेले केजरवाल ‘आप’चे तिसरे नेते आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात भारत राष्ट्र समितीच्या नेत्या व तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. कविता यांनाही न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
न्यायालयाने दोन वेळा ‘ईडी’ची कोठडी दिल्यानंतर सोमवारी केजरीवाल यांची रवानगी तुरुंगात केली. केजरीवाल यांना तुरुंग क्रमांक-२ मध्ये ठेवण्यात आले असून कोठडीमध्ये केजरीवाल एकटेच आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असतील. राऊस जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी दुपारनंतर केजरीवालांना तिहार तुरुंगात आणण्यात आले. दररोजची औषधे तसेच, विशेष स्वरूपाचे जेवण त्यांना पुरवले जाईल. त्यांना कोठडीमध्ये पुस्तके वाचण्याची मुभा मिळाली आहे.
हेही वाचा >>> “तुमच्या घराचं नाव बदललं तर…?”, अरुणाचल प्रदेशवरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीनला पुन्हा सुनावलं!
सहकाऱ्यांचा उल्लेख
दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील मंत्री व ‘आप’चे नेते आतिशी व सौरभ भारद्वाज या दोघांचा ‘ईडी’ने न्यायालयात पहिल्यांदाच उल्लेख केला. केजरीवाल यांनी चौकशीदरम्यान दोन्ही सहकाऱ्यांचे नाव घेतल्याचा दावाही ‘ईडी’ने केला. या प्रकरणातील आरोपी व ‘आप’चे तत्कालीन माध्यम विभागाचे प्रमुख विजय नायर यांच्यावर दक्षिणेतील व्यापाऱ्यांसाठी ‘आप’च्या वतीने मध्यस्थी करत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ‘नायर आपल्याला नव्हे तर आतिशी व भारद्वाज यांना भेटत असे’, असे केजरीवाल यांनी सांगितले असल्याची माहिती ‘ईडी’ने न्यायालयाला दिली. मात्र, ही माहिती नायरने यापूर्वीच ‘ईडी’ला दिली होती. मग, आत्ता ‘ईडी’ने पुन्हा तीच माहिती न्यायालयाला कशासाठी दिली असा प्रश्न ‘आप’चे नेते जैस्मीन शहा यांनी पत्रकारांशी बोलताना केला. तर, आतिशी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
याचिकेवर उद्या सुनावणी
केजरीवाल यांनी ‘ईडी’ने केलेल्या अटकेच्या विरोधात दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने ‘ईडी’ने मागितलेल्या रिमांडसंदर्भात प्रत्युत्तर सादर करण्यास सांगितले होते. या याचिकेवर ३ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
न्यायालयाने त्यांना दोषी जाहीर केलेले नाही. त्यांना तुरुंगात का ठेवले जात आहे? त्यांचा (भाजप) केवळ एकच उद्देश आहे – लोकसभा निवडणुकीच्या आधी अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात ठेवणे. देशातील जनता या या हुकुमशाहीला उत्तर देईल. – सुनीता केजरीवाल, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी