तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार के. कविता यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने शुक्रवारी (१५ मार्च) अटक केली. के. कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला. मात्र, या कारवाईत कविता यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्यांना दिल्लीच्या विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावली. यानंतर आता ईडीने कविता यांच्यावर दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाच्या नेत्यांशी १०० कोटींचा व्यवहार केल्याचा दावा केला आहे.
कविता यांचा दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणाशी संबंधित ‘साऊथ ग्रुप’शी संबंध असल्याचाही आरोप आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात कविता यांनी आम आदमी पक्षाचे नेते, माजी उमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी व्यवहार करत तब्बल १०० कोटी रूपये दिल्याचे ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे के. कविता यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकरणाशी संबधित सर्व आरोप कविता यांनी फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी के. कविता आहेत तरी कोण?
के. कविता कोण आहेत?
के. कविता या माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. तसेच विधान परिषदेच्या आमदार आहेत. कविता यांनी २०१४ मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केला. यानंतर त्यांनी ‘बीआरएस’कडून २०१४ ला लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर त्या २०२१ मध्ये विधान परिषदेवर निवडून आल्या.
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ‘या’ नेत्यांवर कारवाई
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया, ‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्यावर तपास यत्रणांनी कारवाई केली. यामध्ये मनीष सिसोदिया हे जवळपास एक वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. दिल्ली कथित मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने आतापर्यंत जवळपास ३० पेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकले आहेत.
तसेच, दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसाठी ईडीने सातवेळा समन्स बजावले. मात्र, अरविंद केजरीवाल हे अद्याप चौकशीसाठी हजर राहिलेले नाही. यानंतर ईडीने न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला.