करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. देशात मोठ्या संख्येने करोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. त्यासोबतच ओमायक्रॉनची बाधा झालेल्या व्यक्तींची संख्या देखील वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन आधीच्या व्हेरिएंटइतका घातक नसल्यामुळे आणि लसीकरण झाल्यामुळे नागरिक काळजी करत नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर सुशीला कटारिया यांनी करोनाबाबत गंभीर इशारा दिला आहे. डॉ. सुशीला यांनी आत्तापर्यंत अनेक करोना रुग्णांवर उपचार केले आहेत.
तीन दिवसांत पाचपट बाधित वाढले!
“करोना हा फक्त एखादा फ्लू नाही जो असाच निघून जाईल. देशात आधीच तिसरी लाट आलेली आहे. गेल्या तीन दिवसांत देशातील बाधितांची संख्या पाच पटींनी वाढली आहे. ओमायक्रॉन जगभरात पसरत असल्यामुळे ही संख्या वाढतेय यात कोणतीही शंका नाही”, असं डॉ. कटारिया यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे. “हा डेल्टापेक्षा कमी घातक आहे. पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही”, असंही त्या म्हणाल्या.
विषाणूला आमंत्रण देऊ नका!
“रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची परिस्थिती गंभीर होत आहे. माझ्या हॉस्पिटलमध्येच दोन ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. ते ऑक्सिजनवर आहेत. याआधी ओमायक्रॉनमुळे आमच्या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत काल ८ जणांचा मृत्यू झाला. कदाचित ते सगळे ओमायक्रॉनबाधित होते”, असं त्या म्हणाल्या. “तो घातक नाही, हे आपल्यासाठी चांगलं आहे. पण कुणीही आत्मसंतुष्ट होऊ नका. विषाणूला आमंत्रण देऊ नका. त्यापासून संरक्षण करण्यासाठी शक्य ते सगळं करा. जर कुणी बाधित झालं, तर याची खात्री करा की तुम्ही इतरांना त्याची बाधा करणार नाही”, असं देखील डॉ. कटारिया यांनी नमूद केलं.
लोकसत्ता विश्लेषण : देशात एक लाख रुग्णांचा टप्पा गाठण्यासाठी आठ ते १० दिवस कसे लागले? जाणून घ्या..
आकडेवारी काय सांगते?
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल १ लाख १७ हजार १०० करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातला पॉझिटिव्हिटी रेट आता ७.७४ टक्क्यांवर गेला आहे. देशात आत्तापर्यंत ३ कोटी ५२ लाख २६ हजार ३८६ नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. तर दुसरीकडे एकूण ३ हजार ००७ व्यक्तींना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. त्यापैकी ११९९ व्यक्ती पुन्हा निगेटिव्ह देखील झाल्या आहेत.