वंशाला दिवा हवा, मुलगाच हवा, अशा मागास विचारांमधून आजवर अनेकांनी आपल्या पोटच्या मुलींचा जीव घेतला. समाजात शिक्षणाचा प्रसार होत असताना एकाबाजूला मुलींना मारण्याचे प्रमाण कमी होत असताना दिल्लीसारख्या मोठ्या शहरात नवजात जुळ्या मुलींना जन्मदात्या बापानेच नख लावल्याची घटना घडली आहे. जुळ्या मुलींचा जन्म झाला म्हणून नाराज झालेल्या सासरच्या कुटुंबाने हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे. आईच्या कुशीतून दोन मुली उचलून नेऊन पिता आणि इतर कुटुंबियांनी त्यांची हत्या केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, या प्रकरणात एफआयर दाखल झाला आहे. मुलींची आई मुळची हरियाणामधील रोहतक येथील आहे. २०२२ मध्ये लग्न झाल्यानंतर सदर महिला बाह्य दिल्लीच्या पूथ कलान परिसरातील सासरी आली होती. लग्न झाल्यापासून हुंड्यासाठी आपला वारंवार छळ केला जात असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच मुलाचाच जन्म झाला पाहिजे, असाही दबाव टाकला जात होता. गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबियांकडून गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी दबाव टाकला जात होता, असेही महिलेने म्हटले आहे.

सदर महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर उपचाराच्या नावाखाली कुटुंबियांना दोन्ही मुलींना आईपासून वेगळे केले. दोन्ही मुली अशक्त असून त्यांना उपचाराची गरज असल्याची बतावणी कुटुंबियांनी केली. मात्र महिलेने अधिक चौकशी केल्यानंतर दोन्ही मुली आजारी होत्या, त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.

सासरची मंडळी खोटं बोलत असल्याचा संशय आल्यामुळे पीडित महिला आणि तिच्या माहेरच्या लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी उपविभाग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून परवानगी घेत नवजात अर्भकांना ज्या ठिकाणी पुरले होते, तिथून परत बाहेर काढत वैद्यकीय चाचणी केली. तसेच इतर कायदेशीर कार्यवाही सुरू केली.

पीडित महिलेचे नाव पूजा असल्याचे सांगितले जात असून ती बीएससी पदवीधर आहे. अशाप्रकारे आपल्या जुळ्या मुलींना जगाचा निरोप घ्यावा लागेल, याची तिने कधीही कल्पना केली नव्हती. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना पूजा आणि तिचा भाऊ जगनू खत्री यांनी मागच्या तीन आठवड्यात त्यांच्या बरोबर घडलेल्या अप्रिय घटनांची माहिती दिली. २ फेब्रुवारी २०२२ रोजी पदवीधर असलेल्या पूजाचा मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिले होते. जवळपास ३० लाखांचा हुंडा, दागिने आणि इतर वस्तू देऊन पूजाला सासरी पाठविले होते. मात्र इतके करूनही सासरच्यांनी हे राक्षसी कृत्य का केले? हे कळण्यास मार्ग नसल्याची व्यथा पूजाच्या भावाने व्यक्त केली.