Farmers march: कर्जमाफी आणि दीडपट हमीभावाच्या मागणीसाठी देशातील हजारो शेतकरी आज (शुक्रवारी) दिल्लीत पोहोचले असून रामलीला मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा संसदेवर धडकणार आहे. या मोर्चात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घ्यावा आणि देशभरातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी कायदा मंजूर करावा, अशा दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत पोहोचले आहेत. गुरुवारी शेतकऱ्यांचा मोर्चा रामलीला मैदानात पोहोचला होता. शेतकऱ्यांचा मोर्चा रामलीला मैदानातच थांबवण्याचा दिल्ली पोलिसांचा प्रयत्न सुरु होते. यासाठी दिल्ली पोलीस आणि मोर्चाचे आयोजन करणारे नेते यांच्यात चर्चा देखील झाली. मात्र, शेतकरी नेते संसदेवर मोर्चा नेण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि अखेर शेतकऱ्यांचा मोर्चा संसदेच्या दिशेने रवाना झाला.
दिल्लीतील रामलीला मैदानावर सगळे विरोधक सत्तााधाऱ्यांविरोधात एकवटले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन त्यांनी पाळले नाही. जर देशातल्या उद्योजकांचे कर्ज माफ होऊ शकते तर मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ का केले जाणार नाही? असाही प्रश्न राहुल गांधी यांनी रामलीला मैदानावर उपस्थित केला आहे. तसेच काँग्रेस तुमच्यासोबत असल्याचेही राहुल गांधींनी म्हटले आहे
शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
संसदेवर मोर्चा नेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या मोर्चात जवळपास ३५ हजार शेतकरी सहभागी झाले असून मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वाहतूक मंदावली आहे.
शेतकऱ्यांचा मोर्चा संसद मार्गावर पोहोचला असून सध्या शेतकऱ्यांचा मोर्चा जंतर मंतर येथे थांबला आहे. या मोर्चाक २५ राज्यांमधील शेतकरी सहभागी झाल्याचा दावा
जीएसटीसाठी मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन पार पडले. दोन्ही सभागृह एकत्र येतात, जीएसटीला मंजुरी मिळते. मग शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन का नाही?: राजू शेट्टींचा सरकारला सवाल
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणारा व्यक्तीच देशावर राज्य करणार. शेतकरी ज्याला पाठिंबा देतील त्याचीच सत्ता येईल. जो शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणार त्याचे नुकसानच होईल: राजू शेट्टी
शेतकऱ्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. यासंदर्भात कायदा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि या मागण्या मान्य कराव्यात: राजू शेट्टी
देशातील कानाकोपऱ्यातील शेतकरी या मोर्चात सामील होण्यासाठी दिल्लीत आले आहेत.
संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे.
दिल्लीत शेतकऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात