संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी दिल्लीबाहेर घेण्यात यावी, या मागणीसाठी या खटल्यातील सहा आरोपींच्या वतीने करण्यात आलेली याचिका सरन्यायाधीश अल्तमास कबीर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने फेटाळली.
या खटल्यातील आरोपींनी त्यांच्या वतीने युक्तिवाद करण्याचे अधिकार अ‍ॅड. एम. एल. शर्मा यांना दिलेले नाहीत, असा अहवाल सत्र न्यायालयाने दिला होता. त्या अहवालावर सविस्तर चर्चा केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने ही याचिका फेटाळली. याचिकेची सुनावणी अन्यत्र घेण्यात यावी, याबाबत शर्मा हे युक्तिवाद करीत होते, मात्र आरोपींनी आपल्याला युक्तिवाद करण्याचे अधिकार दिलेले नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या अहवालावर सविस्तर चर्चा केल्यानंतर स्पष्ट केले. त्यानंतर या खटल्याबाबत स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपले म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती शर्मा यांनी न्यायालयास केली, मात्र शर्मा यांचा युक्तिवाद आम्ही स्वीकारण्यास असमर्थ आहोत, असे सांगून न्यायालयाने त्याला मंगळवारी नकार दिला.

Story img Loader