दिल्लीतील सामूहिक बलात्कार झालेल्या २३ वर्षीय तरुणीची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे. पीडित तरूणीला उपचारांसाठी सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची प्रकृती कमालीची चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रवक्त्याने दिली. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पीडित तरूणीला सर्वोतपरी मदत करण्याचे जाहिर केल्यानंतर आज (शुक्रवार) सोनिया गांधींनी आपले मौन सोडत ‘ती’ तरूणी सुखरूप भारतात परतावी अशी प्रार्थना केली.  
राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन असून, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सोनिया गांधी बोलत होत्या. पीडित तरूणीची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने वर्धापनदिन जोरदार साजरा न करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.
या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा करावी असे सांगत सोनिया गांधी म्हणाल्या, की सरकारतर्फे महिलांच्या सुरक्षेबाबत कठोर निर्णय घेण्यात येणार आहेत. रुग्णालयात मृत्यूशी झुंजणाऱ्या या तरूणीच्या चांगल्या प्रकृतीसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, असंही त्या पुढे म्हणाल्या.

Story img Loader