Delhi Komal Murder: दिल्लीमध्ये कोमल नावाच्या तरुणीचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून केल्यानंतर या तरुणीच्या शरीराला दगड बांधून दिल्लीच्या छावला कालव्यात फेकून देण्यात आले होते. दिल्ली पोलिसांना कालव्यात तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणी चौकशी केली गेली, ज्यानंतर आसिफ नावाच्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल आणि आसिफ एकमेकांना ओळखत होते. दोघेही दिल्लीच्या सुंदर नगरी या परिसरात राहत होते. १२ मार्च रोजी आसिफ आणि कोमल सीमापुरी भागात भेटले. आसिफने कोमलला आपल्या वाहनात बसण्यास सांगून छावला कालव्या जवळ आणले होते. त्यानंतर दोघांमध्ये जबर भांडण झाले. ज्यानंतर आसिफने कोमलचा खून केला. तसेच तिच्या शरीराला दगड बांधून कालव्यात फेकले.
१७ मार्च रोजी कोमलचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात तरंगत असल्याचे दिसल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. छावला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याआधी सीमापुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा आधीच दाखल झालेला होता. पोलिसांनी आसिफला अटक केली असून त्याचे वाहन जप्त केले आहे. या गुन्ह्यात आणखी कुणाचा हात आहे का? याचा तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ आणि कोमल अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते. आसिफ टॅक्सी चालक आहे.
वृद्ध दाम्पत्याची हत्या
दिल्लीमध्ये गुन्ह्याच्या अनेक घटना अलीकडे घडल्या आहेत. मंगळवारी (१८ मार्च) वायव्य दिल्लीतील कोहत एन्क्लेव्ह येथील इमारतीमध्ये वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला होता. घरातील मोलकरणीने ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृतदेह ज्यादिवशी आढळून आले, त्याच्याही दोन-तीन दिवस आधी त्यांचा खून झालेला असावा. मंगळवारी त्याच परिसरात राहणारा वृद्ध दाम्पत्याचा मुलगा घरी आल्यानंतर सदर गुन्हा उघड झाला होता. पोलिसांनी मोलकरणीला संशयित म्हणून अटक केली आहे. चौकशीनंतरच या गुन्ह्यामागचा हेतू उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.