रोज निम्म्याच मोटारी रस्त्यावर
दिल्लीत हवा प्रदूषणाला आळा घालण्यासाठी रोज निम्म्याच मोटारी रस्त्यावर येऊ दिल्या जातील अशी घोषणा दिल्ली सरकारने केल्यानंतर आज तो कार्यक्रम राबवण्याची रूपरेषा जाहीर करण्यात आली. त्यानुसार आता विषम क्रमांक असलेल्या गाडय़ा सोमवार, बुधवार व शुक्रवारी धावतील तर समक्रमांक असलेल्या गाडय़ा मंगळवार, गुरुवार व शनिवारी धावतील. या गाडय़ा कुणाच्याही असल्या तरी हा नियम पाळावा लागणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातही (एनसीआर) तो लागू राहील. त्यामुळे केंद्रीय मंत्री व नोकरशहा यांनी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर शिस्तीचा बडगा दिल्ली पोलिसांना उगारावा लागणार आहे.
दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, सरकार या योजनेत पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हॅन, अग्निशामक बंब व रुग्णवाहिका यांना समाविष्ट करणार नाही. दिल्लीतील हवा प्रदूषण गंभीर पातळीला पोहोचले आहे, त्यामुळे राष्ट्रीय राजधानी परिसरातही मंत्री व नोकरशहांना हा नियम पाळावा लागणार आहे. सम व विषम क्रमांकाच्या गाडय़ांचा नियम लागू करताना गाडी कुणाची आहे याचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही. मी माझी गाडी नियमानुसार वापरेन, लोकांनी या योजनेबाबत सूचना कराव्यात त्यासाठी स्र्’’४३्रल्लऋ१ीीि’ँ्र@ॠें्र’.ू या पत्त्यावर माहिती पाठवावी. दिल्लीत थंडीच्या दिवसात प्रदूषणाची पातळी वाढते कारण धुके जास्त असते व त्यामुळे व्यायामाला सकाळी बाहेर पडणेही धोकादायक बनले आहे. राष्ट्रीय राजधानीत अनेक कंपन्या जनरेटर्स वापरत आहेत त्याचाही सरकार विचार करील.
केजरीवाल यांनी सांगितले की, लोकांना यात समस्या जाणवू लागल्या तर ही योजना १० ते १५ दिवसानंतर बंद केली जाईल. चार डिसेंबरला आम आदमी पक्षाच्या सरकारने खासगी वाहनांना सम व विषम क्रमांकाच्या निकषावर रस्त्यावर धावण्यास परवानगी देण्याचा नियम १ जानेवारीपासून लागू करण्याचे ठरवले आहे.
‘सम-विषम’ योजनेचे स्वागत
दिल्लीच्या ‘आप’ सरकारने प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांसाठी आखलेल्या ‘सम-विषम’ योजनेचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी समर्थन केले आहे. या योजनेमुळे समस्या कमी होण्यास मदत झाल्यास तिची अंमलबजावणी करता येईल, या न्या. ठाकूर यांच्या म्हणण्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वागत केले आहे.