दिल्लीतील एका बड्या सरकारी अधिकाऱ्याने आपल्या मित्राच्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून आरोपीनं २०२० ते २०२१ या कालावधीत अनेकदा बलात्कार केला आहे. एवढंच नव्हे तर पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं आपल्या पत्नीच्या मदतीने तिचा गर्भपात केला आहे. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी हा दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या उपसंचालक पदावर कार्यरत आहे. या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या कारणावरून आरोपीच्या पत्नीवरही गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०२० मध्ये दिल्लीतील एका चर्चमध्ये पीडितेची आरोपीशी ओळख झाली. पीडित मुलीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला कुणाचा आधार उरला नव्हता. ती दु:खात असताना तिचं सांत्वन करण्याच्या बहाण्याने आरोपी अधिकाऱ्यानं तिच्याशी ओळख वाढवली. नंतर तिला तो घरीही घेऊन आला. एफआयआरनुसार, आरोपी उपसंचालकाने २०२० ते २०२१ या कालावधीत १४ वर्षीय पीडितेवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा- VIDEO: घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर ऑनकॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न, ६ जणांना अटक
पीडित मुलीला जेव्हा ती गर्भवती असल्याचं समजलं तेव्हा तिने उपसंचालकांच्या पत्नीला हा सर्व प्रकार सांगितला. यानंतर आरोपीच्या पत्नीने पोलिसांत तक्रार करण्याऐवजी तिने पीडितेला हे प्रकरण दडपण्यास सांगितलं. तसेच पीडितेला गर्भपात करण्याच्या गोळ्याही दिल्या. रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.