Delhi HC judge Yashwant Varma House Case : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागल्याच्या घटनेमुळे बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या संपूर्ण प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा रंगली. या घटनेमुळे न्यायाधीश वर्मा यांनी हे देखील चर्चेत आले. मात्र, हे सर्व आरोप यशवंत वर्मा यांनी फेटाळून लावले. तसेच आपल्याला फसवण्याचं आणि बदनाम करण्याचं हे षड्‍यंत्र असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

या प्रकरणात अंतर्गत चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. दरम्यान, आगीत जळालेल्या नोटांचे तुकडे आढळून आल्यानंतर चर्चेत आलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बदलीची शिफारस करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने यशवंत वर्मा यांच्या बदलीची शिफारस केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयातून त्यांना आता अलाहाबाद उच्च न्यायालयात पाठवण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २० व २४ मार्च रोजी झालेल्या बैठकीत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांना अलाहाबादला पाठवण्याची शिफारस आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ही शिफारस केल्यानंतर आता न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर या निर्णयाच्या संदर्भातील निवेदन जारी करण्यात आलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी काय म्हटलं होतं?

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागल्याच्या घटनेमुळे बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याच्या घटनेवर बोलताना यशवंत वर्मा यांनी म्हटलं होतं की, “आग विझविताना सगळे कर्मचारी आणि घरातील सर्व सदस्यांना सुरक्षेच्या कारणास्तव घटना स्थळावरून दूर जाण्यास सांगण्यात आले. जेव्हा आग विझवण्यात आली आणि जेव्हा ते घटनास्थळावर परत गेले तेव्हा त्यांना कोणतीही रोख रक्कम किंवा नोटा दिसल्या नाहीत. मी स्पष्टपणे सांगतो की त्या स्टोअररूममध्ये मी किंवा मा‍झ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कधीही रोख रक्कम ठेवली नाही आणि कथित रोख रक्कम आमची आहे असे सांगितले जात असल्याचा मी तीव्र निषेध करतो. ही रोकड आम्हीच ठेवली किंवा जमा केली होती ही कल्पना पूर्णपणे हास्यास्पद आहे”, असं न्यायमूर्ती वर्मा यांनी म्हटलं होतं.

“तसेच ही एक खोली आहे जी माझ्या राहण्याच्या जागेपासून पूर्णपणे वेगळी आहे आणि बाऊंड्री वॉल माझी राहण्याची जागा आणि आऊट हाऊस यांना वेगळं करते. माझी एवढीच इच्छा आहे की, माध्यमांनी माझ्यावर आरोप ठेवण्यापूर्वी आणि प्रेसमध्ये बदनामी करण्यापूर्वी थोडीशी चौकशी करायला हवी होती”, असंही वर्मा यांनी म्हटलं होतं.