Shark Tank fame Ashneer Grover: BharatPe आणि कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर यांच्यातला वाद आता कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला आहे. दोन्ही बाजूंनी ट्विटरवर एकमेकांवर कुरघोडी करणारे ट्वीट्स केले जात आहे. मात्र, या शाब्दिक वादामध्ये खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असल्याचं दिसू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने या दोघांनाही फैलावर घेतलं आहे. तसेच, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका करताना असंसदीय शब्दांचा वापर करू नये, असंही न्यायालयाने सुनावलं आहे.
अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कंपनीवर अपमानजनक टिप्पणी करू नये, या मागणीसाठी करण्यात आलेल्या याचिकेवर सध्या न्यायालयात सुनावणी चालू आहे. अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबीयांना यासंदर्भात कंपनीबाबत टीका-टिप्पणी करण्यापासून कायमची बंदी घातली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने परखड मत व्यक्त केलं आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रतीक जालान यांच्या एकसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. यासंदर्भात दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने सुनावणीसाठी पुढची तारीख दिली. मात्र, असं करताना दोन्ही बाजूंना फटकारलं. “ही याचिका पुढील सुनावणीपर्यंत राखून ठेवतानाच न्यायालयाची दोन्ही बाजूच्या सन्माननीय वकिलांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या अशीलांना समज द्यावी. त्यांच्या अशीरांनी एकमेकांविरोधात असंसदीय भाषेत टीका-टिप्पणी टाळावी”, असं न्यायमूर्ती जालान यांनी नमूद केलं.
“जर तुम्ही ठरवलंच असेल तर…”
भारतपेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली. तेव्हापासून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीकेचा कलगीतुरा सुरू झाला. यासंदर्भात टिप्पणी करतानाच न्यायमूर्ती जालान यांनी संतप्त मत व्यक्त केलं. “ही काही रस्त्यावरची भांडणं नाहीयेत. तुम्ही जर गटारात राहायचं ठरवलंच असेल, तर मग कृपया गटारात राहा”, असं न्यायमूर्तींनी म्हटल्याचं बार अँड बेंचनं आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २४ मे रोजी आहे.
“आम्ही एकत्र आंघोळ करायचो, कारण…”; अश्नीर ग्रोव्हरच्या पत्नीचा खुलासा
नेमका वाद काय?
अशनीर ग्रोव्हर आणि भारतपे यांच्यादरम्यानच्या वादावर दिल्ली उच्च न्यायालयाने ९ जानेवारी रोजी दोन्ही बाजूंना एकमेकांवर टीका करताना भान ठेवण्याचे निर्देश दिले. मात्र, भारत पे ची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांच्या युक्तिवादानुसार १० मे रोजी कंपनीनं अशनीर ग्रोव्हर यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अचानक आक्रमकपणे आणि खालच्या पातळीवर ट्विटरवर टीका करायला सुरुवात केली. अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या या कृतीमुळे कंपनीला ८१ कोटींचं नुकसान झाल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, अशनीर ग्रोव्हर यांनी यानंतर ट्विटरवर एका बनावट नोटेवर कंपनीचे संचालक रजनीश कुमार यांचा फोटो लावून त्यावर खोचक टिप्पणी केली होती. यावरूनही न्यायमूर्ती जालान संतापले. “ही कसली भाषा आहे? Sk बनावट नोट घेऊन त्यावर दुसऱ्या कुणाचातरी फोटो लावणं. तुमचे अशील या पातळीवर जाऊ इच्छितात का?” असा संतप्त सवाल न्यायमूर्तींनी अश्नीर ग्रोव्हर यांची बाजू मांडणारे वकील गिरिराज सुब्रह्मण्यम यांना केला.