अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे भारतभेटीवर येणार असल्याने केवळ एका आठवडय़ात १५ हजार सीसीटीव्ही बसविल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारला चांगलेच फटकारले. देशातील नागरिकांच्या गरजांची पूर्तता करताना इतकी तत्परता का दाखविली जात नाही, असा सवालही न्यायालयाने केला आहे.
दिल्लीत सामूहिक बलात्कारासारख्या भीषण घटना घडल्या आहेत, त्या पाश्र्वभूमीवर बराक ओबामा यांच्या भेटीनंतरही हे सीसीटीव्ही कॅमेरे काढले जाऊ नयेत, अशी याचिका करण्यात आली होती. त्यावेळी न्या. बदर अहमद आणि न्या. संजीव सचदेव यांच्या पीठाने सरकारला वरील सवाल केला.
परदेशी अध्यक्ष असल्याने तुम्ही उपाययोजना केल्या, भारतीय नागरिकांसाठी नाही, न्यायालयाने आदेश दिले तरी त्याची अंमलबजावणी करण्यास महिने अथवा वर्षे जातात, मात्र या वेळी हे काम काही आठवडय़ांतच झाले, असेही पीठाने म्हटले आहे. सदर कॅमेरे काढण्यात येणार आहेत का या बाबत स्पष्टीकरण द्यावे, अशा नोटिसा केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि शहर पोलिसांना पाठविण्यात आल्या आहेत.