देशात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर नवी राजकीय चर्चा सुरू असताना बिहारमध्ये मात्र लोजपामधल्या राजकीय यादवीचीच चर्चा सुरू आहे. लोकजनशक्ती पार्टीचे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झाल्यापासून त्यांचे धाकटे बंधू आणि विद्यमान केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस आणि चिराग पासवान यांच्यामध्ये राजकीय युद्ध सुरू झालं आहे. लोकसभेतील पक्षाच्या नेतेपदी पशुपतीकुमार पारस यांची नियुक्ती करण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला चिराग पासवान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र, त्यांची याचिका फेटाळून न्यायालयानं त्यांच्या प्रयत्नांना जोरदार तडाखा दिला आहे.

लोजपामध्ये अंतर्गत वाद

गेल्या दोन महिन्यांपासून बिहारमधील एक प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीमधला हा अंतर्गत वाद चर्चेचा विषय ठरला आहे. चिराग पासवान यांना बाजूला सारत पशुपतीकुमार पारस यांनी पक्षातल्याच त्यांच्या समर्थकांना हाताशी धरून स्वत:ची लोकसभेतील पक्षनेतेपदी निवड करून घेतली. यानंतर थेट केंद्रीय मंत्रिमंडळात पशुपतीकुमार पारस यांची वर्णी लागली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांसोबतच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पशुपतीकुमार पारस यांच्या राजकीय धोरणांना एक प्रकारे समर्थनच दिल्याचं बोललं जात आहे.

 

पक्षातूनच चिराग पासवान यांना विरोध!

लोकजनशक्ती पार्टीचे लोकसभेत एकूण ६ खासदार आहेत. त्यात चिराग पासवान आणि पशुपतीकुमार पारस या दोघांसह इतर ४ खासदार आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी पशुपतीकुमार पारस यांनी इतर ४ खासदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन स्वत:ला पक्षनेता म्हणून घोषित केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील त्यांच्या नावाला संमती दिली. दुसरीकडे चिराग पासवान यांनी संतप्त होत पशुपतीकुमार पारस आणि इतर ४ खासदारांना पक्षातून निलंबित केल्याचं जाहीर केलं. पण उलट त्याच्या काही दिवसांतच पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये पशुपतीकुमार पारस यांचीच अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे चिराग पासवान यांना पहिला झटका तिथे बसला.

Cabinet Reshuffle : बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवणारे पशुपतीकुमार पारस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी!

पंतप्रधान मोदींनीही केलं दुर्लक्ष

काही दिवसांनी चिराग पासवान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच या प्रकरणात लक्ष घालण्याचं साकडं घातलं. “मी आजपर्यंत हनुमानाप्रमाणे पंतप्रधानांना प्रत्येक अडचणीच्या काळात साथ दिली. आज जेव्हा हनुमानाचा राजकीय वध करण्याचा प्रयत्न होत असताना मला विश्वास आहे की अशा परिस्थितीत राम शांत बसणार नाहीत”, असं म्हणत चिराग पासवान यांनी पंतप्रधानांना आवाहन केलं. पण तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. पंतप्रधानांनी पशुपतीकुमार यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात घेत त्यांचं एक प्रकारे समर्थनच केलं.

आज हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाहीत असा विश्वास – चिराग पासवान

सभागृहातील निर्णयाचा अधिकार अध्यक्षांनाच

आता दिल्ली उच्च न्यायालयाने चिराग पासवान यांची याचिका फेटाळल्यामुळे त्यांना मोठा झटका बसला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पशुपतीकुमार पारस यांच्या पक्षनेतेपदाला मंजुरी देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका चिराग पासवान यांनी केली होती. मात्र, “संसदेच्या सभागृहातील वाद सोडवणे किंवा त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार हा लोकसभा अध्यक्षांनाच असतो. त्यामुळे ही याचिका निराधार ठरते”, असं म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

Story img Loader