Visa For Pakistani Women: दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतेच एका पाकिस्तानी महिलेच्या भारतातील दीर्घकालीन व्हिसाच्या अर्जावर विचार करण्यासाठी सरकारला निर्देश द्यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. शीना नाज नावाच्या महिलेचे लग्न एका भारतीय नागरिकाशी झाले आहे आणि तिने २३ एप्रिल रोजी दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने २४ एप्रिल रोजी पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपूर्वी भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

यानंतर नाझ यांनी त्यांच्या दीर्घकालीन व्हिसा अर्जावर विचार करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तसेच २६ मार्च ते ९ मे पर्यंत वैध असलेला त्यांचा निवासी परवाना निलंबित न करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली होती. याबाबत बार अँड बेंचने वृत्त दिले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या विशेष सुनावणीत न्यायमूर्ती सचिन दत्ता म्हणाले की, “सरकारचा निर्णय कोणत्याही न्यायालयीन पुनरावलोकनास पात्र नाही कारण तो निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आला आहे.”

न्यायालयाने म्हटले आहे की, “प्रथमदर्शनी, द फॉरेनर्स अॅक्ट, १९४६ च्या कलम ३(१) अंतर्गत जारी केलेला वरील आदेशास कोणत्याही न्यायालयीन पुनरावलोकनाची आवश्यकता नाही कारण तो गंभीर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जारी करण्यात आला आहे. याला कोणताही अपवाद शोधणे हे या न्यायालयाचे अधिकार क्षेत्र नाही.”

न्यायालयाने याचिकेवर विचार करण्यास अनिच्छा व्यक्त केल्यामुळे, याचिकाकर्त्याच्या वकिलांनी ती मागे घेतली. त्यानुसार न्यायालयाने याचिका मागे घेतल्याने फेटाळली. याबरोबर प्रलंबित अर्ज देखील निकाली काढले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या एका प्रकरणात या निर्णयाचा फटका बसलेल्यांमध्ये पाकिस्तानी वंशाच्या ५५ वर्षीय शारदाबाई यांचाही समावेश आहे. त्यांचे लग्न एका भारतीय नागरिकाशी झाले असून, गेल्या ३८ वर्षांपासून त्या ओडिशामध्ये राहत आहेत.

शारदाबाई, लग्नानंतरच्या शारदा कुकरेजा यांचा जन्म १९७० मध्ये पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सुक्कुर शहरात झाला होता, असे त्यांच्या पाकिस्तानी पासपोर्टवरून दिसून येते. जिल्हा पोलिसांनी त्यांना भारत सोडण्याची नोटीस पाठवली आहे. यामध्ये म्हटले आहे की, शारदाबाई यांच्याकडे भारताचा दीर्घकालीन व्हिसा नाही किंवा त्या सूट दिलेल्या श्रेणींमध्येही येत नाहीत. त्यांनी दिलेल्या मुदतीत भारत सोडला नाही तर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.