दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी १९८४ सालच्या शीखविरोधी दंगलीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालानुसार शीखविरोधी दंगलीतील  ३० वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेले पाच खटले नव्याने चालवण्यात येणार आहेत. या खटल्यातील साक्षीदारांची उलट तपासणीच झाली नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

दिल्ली उच्च न्यायालयाने यासाठी तीन वकिलांची अमायकस क्युरी (न्यायमित्र) म्हणून नियुक्ती केली असून पोलिसांनाही या प्रकरणातील तक्रारींचा छडा लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या खटल्यातील तक्रारदारांना २० एप्रिलपूर्वी न्यायालयासमोर हजर करण्यासही सांगितले आहे. हे पाचही खटले दिल्ली कॅन्टोनमेंट आणि सुलतानपूर परिसरात झालेल्या हत्यांविषयी आहेत. तत्पूर्वी शुक्रवारी न्यायालयाने केंद्र सरकारला १९८४ सालच्या शीखविरोधी दंगलीतील १९९ फाईल्स जमा करण्याचे आदेश दिले होते. या सर्व फाईल्स विशेष तपास पथकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

Story img Loader