Baba Ramdev on Rooh Afza of sharbat Jihad: योगगुरू बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वी रूह अफजा सरबतवर टीका करताना या सरबतच्या विक्रीतून मिळणारा पैसा मदरसे आणि मशिदी बनविण्यासाठी जातो, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर आता दिल्ली उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हमदर्द कंपनीच्या रूह अफजा सरबतवर टीका करताना बाबा रामदेव यांनी सरबत जिहाद असा शब्द वापरला होता. बाबा रामदेव यांची टीका न्यायालयाच्या विवेकाला धक्का देणारी आहे, अशी टिप्पणी हमदर्द कंपनीच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केली.

बाबा रामदेव यांनी एप्रिलच्या सुरूवातीला पतंजलीच्या गुलाब सरबत आणि इतर उत्पादनांची जाहिरात करत असताना बाजारातील लोकप्रिय रूह अफजा सरबतवर टीका केली. ते म्हणाले, काही कंपन्या तुम्हाला सरबत विकतात आणि त्यातून मिळणारा पैसा मशीद आणि मदरसे उभारण्यासाठी दिला जातो. यावेळी त्यांनी रूह अफजाचे थेट नाव घेतलेले नसले तरी त्यांचा रोख या उत्पादनाकडे असल्याचे सूचित होत होते. दरम्यान बाबा रामदेव यांचा व्हिडीओ आता पतंजलीच्या पेजवरून डिलीट करण्यात आला आहे.

“तुम्ही जर त्यांचे सरबत विकत घेत असाल तर मशीद आणि मदरसे बनविण्यासाठी मदत करत आहात. जर तुम्ही ही (पतंजली) उत्पादने विकत घेतलीत तर गुरुकूल, आचार्य कुलम विकसित केले जाईल, पतंजली विद्यापीठाचा विस्तार होईल आणि भारतीय शिक्षा मंडळाची भरभराट होईल”, असे विधान बाबा रामदेव यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर हमदर्द कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

“जसा लव जिहाद असतो, त्याचप्रकारे सरबत जिहाद सुरू आहे. तुम्हाला सरबत जिहादपासून सुरक्षित राहायचे असेल तर हा संदेश सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा”, असेही बाबा रामदेव यांनी व्हिडीओमध्ये म्हटले होते. या टिप्पणीविरोधात हमदर्द कंपनीने याचिका दाखल केली होती.

आधीच देशात खूप अडचणी

ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी हमदर्द कंपनीची बाजू दिल्ली उच्च न्यायालयात मांडली. ते म्हणाले, बाबा रामदेव यांचे विधान धक्कादायक आहे. हे अवमानकारक तर आहेच पण या द्वेषाने भरलेल्या विधानामुळे जातीय तेढही निर्माण होत आहे. तसेच या विधानाचे समर्थन करता येणार नाही. देशात आधीच खूप अडचणी आहेत, असेही मुकुल रोहतगी म्हणाले असल्याचे वृत्त बार अँड बेंचने दिले आहे.

बाबा रामदेव यांनी इतर सरबत कंपन्याच्या उत्पादनांवर टीका करताना ते टॉयलेट क्लिनर असल्याचेही म्हटले होते. सरबत जिहादच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या ड्रिंक्सपासून लोकांनी आपल्या मुलांना वाचवावे आणि केवळ पतंजलीचे सरबत आणि ज्यूसच विकत घ्यावेत.