Delhi IAS coaching centre flooded: दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याकारणाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत जुने राजेंद्र नगर भागातही ठिकठिकाणी पाणी साचले. हा परिसर यूपीएससी परीक्षेच्या कोचिंग सेंटरसाठी ओळखला जातो. इथे शेकडो यूपीएससीची शिकवणी देणारे वर्ग आहेत. यापैकीच एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे काही यूपीएससीचे विद्यार्थी अडकले होते. त्यापैकी दोन विद्यार्थींनींचा मृत्यू झाला असून आणखी एक व्यक्ती दगावली आहे. त्यासाठी घटनास्थळी अद्याप शोधकार्य चालू आहे. तर इतर विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली अग्निशमन सेवा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन फोर्स आणि दिल्ली पोलीस घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे राजेंद्र नगर परीसर जलमय झाला असून याठिकाणी असलेल्या कोचिंग सेंटरच्या तळघरातही पाणी शिरले. त्यामुळे याठिकाणी असलेले लोक अडकले. अग्निशमन दलाला सायंकाळी ७ वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आतमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचे फोन बंद दाखवत असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.

अग्निशमन यंत्रणा आणि एनडीआरएफच्या जवानांनी मिळून तळघरात बचाव कार्य सुरू केल्यानंतर पहिल्यांदा एका मुलीचा मृतदेह बाहेर काढला गेला. त्यानंतर दुसऱ्याही एका मुलीचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, दिल्लीतील भाजपा खासदार बांसुरी स्वराज आणि दिल्ली मनपाच्या महापौरी शेली ऑबेरॉय यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची पाहणी केली. खासदार स्वराज यांनी या घटनेसाठी आम आदमी पक्षाच्या सरकारला दोष दिला. तसेच स्थानिक आमदार दुर्गेश पाठक यांच्याकडे स्थानिकांनी नालेसफाई करण्याची विनंती केली होती. मात्र नालेसफाई न झाल्यामुळे नाल्यातील पाणी तळघरात शिरले.