Delhi IAS Coaching Incident : दिल्लीमधील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या आयएएस कोचिंग सेंटरवर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून या आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, या कोचिंग सेंटरच्या तळघरात कोणत्याही परवानगीशिवाय लायब्ररी सुरु करण्यात आली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. या घटनेवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत अशा संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमावून चुकवावी लागत असल्याचं एक्स (ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करत म्हटलं आहे.

हेही वाचा : Old Rajender Nagar Incident : आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक; परवानगीशिवाय तळघरात सुरू होती लायब्ररी!

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“दिल्लीतील एका इमारतीच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी पावसात विजेचा धक्का लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. पायाभूत सुविधांचा हा ऱ्हास हे व्यवस्थेचं अपयश आहे. असुरक्षित बांधकाम, निकृष्ट नियोजन आणि संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत सर्वसामान्य नागरिक आपला जीव गमावून चुकवत आहेत. सुरक्षित आणि आरामदायी जीवन हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि सरकारची जबाबदारी आहे”, असं खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

नेमकं घटना काय घडली?

दिल्लीमधील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमध्ये यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत श्रेया यादव, तान्या आणि नेविन या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. श्रेया यादव ही उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरमधील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या कोचिंग सेंटरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यानंतर दिल्लीच्या महापौर शेली ओबरॉय यांनी संबंधित कोचिंग सेंटरचे तळघर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दिल्ली पोलिसांनी आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह दुसऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात केली आहे. तसेच परवानगीशिवाय इमारतीच्या तळघरामध्ये लायब्ररी स्थापन करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi ias coaching incident congress leader mp rahul gandhi on delhi rajender nagar ias coaching center incident gkt