मंदिरात नेतो असे सांगत दिल्लीत एका नराधमाने तीन वर्षाच्या चिमूरडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. बलात्कारादरम्यान या नराधमाने त्या चिमूरडीला सिगारेटचे चटकेही दिल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीचे कुटुंब दिल्लीतील गोविंदपुरीमध्ये राहत असून याच विभागात तिचा काकादेखील राहतो. २८ ऑगस्टला पिडीत मुलीचा काका तिच्या घरी गेला. तुमच्या मुलीला देवळात नेऊन आणतो असे सांगत त्याने मुलीला बाहेर नेले.  मुलीच्या अंगात ताप असल्याने सुरूवातीला तिच्या आईने तिला बाहेर न्यायला नकार दिला. मात्र, काहीवेळाने या नातेवाईकाने पीडित मुलीच्या आईला मुलीला बाहेर नेण्यास राजी केले.  मात्र, बराच वेळ उलटूनही दोघेही घरी परतले नाही. तेव्हा तिने दीराला फोन करून याबद्दल विचारले. तुमची मुलगी आजच्या दिवशी माझ्याच घरी थांबेल असे सांगितले. नातेवाईक असल्याने मुलीच्या आईने त्याला परवानगी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आई मुलीला आणण्यासाठी दीराच्या घरी गेली तेव्हा मुलगी झोपली आहे, तिला उठवू नका, असे सांगून दीराने मुलीच्या आईला परत पाठवले. काहीवेळाने मुलीचा भाऊ तिला आणण्यासाठी गेला तेव्हा त्यालाही असेच कारण सांगून काकाने परत पाठविले. शेवटी पती कामावरुन परतल्यावर तिने पतीला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा त्याने लगेच भावाच्या घरी जाऊन आपल्या मुलीला परत आणले. मुलीला घरी आणताना तिच्या अंगावरील जखमेच्या खुणा निदर्शनास आल्या. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिला तत्काळ नजीकच्या रूग्णालयात नेले. रूग्णालयात तिच्या पोटावर आणि हातावर चटके दिल्याचा खुणा आढळले. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचेही निष्पन्न झाले. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मुलीच्या काकाला अटक करण्यात आली. पाच वर्षांपूर्वीदेखील त्याला एका मुलीचा छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले. आपण मुलीला सिगारेटचे चटके दिल्याचे कबुलीही या नराधम काकाने पोलिस चौकशीत दिली आहे.