नवी दिल्ली : रविवारी, २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल हे राजघाट तसेच विजयघाट या समाधीस्थळांवर उपस्थित न राहिल्याने दिल्लीचे नायक राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी केजरीवाल यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. केजरीवाल सरकारने देशाचे घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींचा हेतुपूर्वक अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या पत्रात ते म्हणतात की, महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीला आपण तसेच आपल्या सरकारने (दिल्ली राज्य सरकार) हा महापुरुषांबद्दल जो अनादर दाखविला आहे, ते मी अत्यंत खेदपूर्वक, व्यथित अंत:करणाने आपल्या निदर्शनास आणत आहे. रविवारी राजघाट आणि विजयघाटावर देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष आणि अन्य राजकीय नेते उपस्थित होते, पण आपण (केजरीवाल) किंवा आपल्या सरकारचा मंत्री तेथे उपस्थित राहिला नाहीत, हे आपल्या निदर्शनास आणणे मला भाग पडत आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री (मनीष सिसोदिया) हे केवळ उपचार म्हणून तेथे काही मिनिटे होते, पण पूर्णवेळ तेथे थांबण्याची त्यांना गरज वाटली नाही.
वादाचा मुद्दा नायब राज्यपालांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, जयंती दिनाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दिल्ली सरकारने राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींना रीतसर आमंत्रित केले होते. यासंबंधीचा पत्रव्यवहार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामान्य प्रशासन खात्याचे मंत्री यांच्या मंजुरीने होतो. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी विजयघाटावर उपस्थित राहून राष्ट्रपतींचे स्वागत करणे हे राजशिष्टाचार म्हणून अनिवार्य असल्याचे राष्ट्रपती कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यालयाला कळविले होते. विजयघाटावर श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्याची अधिकृत जबाबदारी ही दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकारची आहे. या कार्यक्रमाच्या आमंत्रणपत्रिका दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने देण्यात आल्या होत्या. पण केजरीवाल तेथे आले नाहीत, तसेच उपमुख्यमंत्री सिसोदिया हे राष्ट्रपतींची प्रतीक्षा न करताच निघून गेले. हे राजशिष्टाचाराचे उल्लंघन तसेच राष्ट्रपतींचा जाणीवपूर्वक केलेला अवमान आहे.