Delhi liquor Policy : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या बहुमतानंतर दिल्लीत भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं, तर आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे दिल्लीत ‘आप’ विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सोमवारपासून दिल्लीत विशेष अधिवेशन सुरु झालं आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मोठा गदारोळ पाहायला मिळाला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यालयामधून शहीद भगतसिंग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हटवल्याचा दावा विरोधी पक्षनेत्या अतिशी यांनी केला. यावरून चांगलंच राजकारण तापलं. यातच आज (२५ फेब्रुवारी) दिल्ली सरकारने कॅगचा अहवाल विधानसभेत सादर केला आहे.

या अहवालात ‘आप’ सरकारच्या कारभाराच्या संदर्भात मोठा खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये शीशमहल, मोहल्ला क्लिनिक, मद्य धोरणासह आदी महत्वाच्या गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचं सरकार सत्तेत असताना मद्य धोरणाच्या अंमलबजावणीमुळे तब्बल २००२ कोटींचा महसूल बुडाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मद्य धोरणाच्या अंमलबजावणीमुळे २००२ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हा अहवाल दिल्ली विधानसभेत आज सादर केला. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मद्य धोरणामध्ये पूर्वी एका व्यक्तीला एक परवाना मिळत असे. मात्र, नव्या धोरणात एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त परवाने मिळू शकत होते. तसेच आप सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे दिल्ली सरकारचे असे नुकसान झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. कॅगच्या अहवालात असं म्हटलं आहे की, झोनल परवाने जारी करण्यात शिथिलता दिल्यामुळे सरकारचे अंदाजे ९४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान, तत्कालीन आम आदमी पार्टी (आप) सरकारने दिल्ली दारू धोरण लागू केल्यानंतर सरकारवर मोठी टीका झाली होती. तसेच आम आदमी पार्टीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर अखेर अरविंद केजरीवाल यांच्या तत्कालीन सरकारने हा निर्णय माघे घेतला होता. मात्र, याच प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांनी दाखल केलेल्या प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह काही ‘आप’च्या नेत्यांना अटक झाली होती.

‘आप’च्या १२ आमदारांचं एक दिवसासाठी निलंबन

दिल्ली विधानसभेत गदारोळ करणाऱ्या जुबेर अहमद, वीरेंद्र सिंह कादियान यांच्यासह विरोधी पक्ष नेत्या आतिशी अशा एकूण १२ आमदारांचं एक दिवसासाठी निलंबन करण्यात आलं आहे. दिल्ली विधानसभेत आज कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात शीशमहलच्या दुरुस्ती आणि देखभाल खर्चाचे तसंच नुतनीकरणाच्या खर्चाचे तपशील आहेत. ज्यावरुन कॅगने आधीच्या सरकारला झापलं आहे. त्यावरुन ‘आप’च्या आमदारांनी हंगामा केला. तसंच दिल्ली विधानसभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हटवून पंतप्रधान मोदींचा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आला. या दोन्ही मुद्द्यांवरुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.

Story img Loader