दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मनी लाँडरिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. मात्र, या जामिनाला ईडीने विरोध करत ४८ तास मागितले होते. मात्र राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत केजरीवालांच्या जामिनास विरोध केला होता. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. अवघ्या २४ तासांच्या आत अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला होता.
यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जामिनाला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी (२४ जून) सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीतील मद्य विक्री घोटाळ्याप्रकरणी ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. त्यानंतर १० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा २ जून रोजी तुरुंगात आत्मसमर्पन केलं होतं.
हेही वाचा : कालचा जामीन आज स्थगित, अरविंद केजरीवाल यांच्या आनंदावर २४ तासांत विरजण!
त्यानंतर ५ जून रोजी वैद्यकीय कारणासाठी जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला होता. मात्र, अंतरिम जामीन देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला होता. तसेच विशेष न्यायालयात नियमित जामिनासाठी त्यांची याचिका प्रलंबित होती. त्यावर विशेष न्यायालयाने केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी वाढविली होती. तसेच जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. याचा निकाल २१ जून रोजी देत न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
तसेच तपासात बाधा किंवा साक्षीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये, गरज पडेल तेव्हा न्यायालयासमोर हजर व्हावे, या अटींसह घातल्या होत्या. मात्र, यावेळी दुसरीकडे ईडीकडून या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ईडीच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीनाला स्थगिती दिली होती. आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळणार का? याकडे आता आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.
ईडीचे काय आरोप आहेत?
ईडीच्या म्हणण्यानुसार, दिल्ली दारू घोटाळ्यातील २०२१-२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या प्रचारात १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सुमारे ४५ कोटी रुपये वापरण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच हा सर्व पैसा दक्षिण गटाकडून मिळालेल्या लाचेतून आला होता. या प्रकरणात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. तसेच या दिल्ली मध्य घोरण प्रकरणात ‘आप’चे नेते माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत.