दिल्लीमधील आदर्श नगर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या एका मुलाने केवळ मैत्री तोडली म्हणून एका २१ वर्षीय तरुणाला चाकूने भोसकलं आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
या प्रकरणामध्ये मंगळवारी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. या तरुणाचं वय २२ वर्ष इतकं आहे. त्याच्याविरोधात कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलाचं नाव सुखविंदर सिंग असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मागील अनेक वर्षांपासून हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. मात्र अचानक या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. या मुलीने सुखविंदर सिंगबरोबर बोलणं बंद केलं. याच मुद्द्यावरुन संतापलेल्या सुखविंदरने या मुलीला चार ते पाच वेळा भोसकलं आणि घटनास्थावरुन पळ काढला. पोलिसांना सुखविंदरने अंबालाला पळ काढल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या तरुणाला अटक केली.
जखमी अवस्थेत या तरुणीला दिल्लीतील जहांगिरपुरीमधील बाबू जगजीवन राम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या तरुणीचा प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणामुळे दिल्लीमधील महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील मुद्दा चर्चेत आला आहे.