निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष मतदारांना चांगल्या सोयीसुविधा देण्याची आश्वसने देताना दिसत आहेत. अनेक वर्षांपासून देण्यात येणाऱ्या आश्वासनांमध्ये स्वच्छ आणि सुंदर रस्ते, पिण्यासाठी स्वच्छ पाणी या आश्वासनांचा समावेश कायमच असतो. मात्र एकीकडे स्मार्ट शहरे उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या सकरकारला स्वच्छ रस्त्यांसारखी मूलभूत सोयही नागरिकांना उपलब्ध करुन देता येत नाही. त्यातही याबद्दल तक्रार करायला जाणाऱ्या नागरिकांना योग्य उत्तर मिळत नाही. प्रशासनाच्या याच वागणुकीला कंटाळून दिल्लीतील एका तरुणाने बॅनरबाजीच्या मदतीने प्रशासनाकडून रस्ते साफ करुन घेतले.
पश्चिम दिल्लीमधील सतगुरु राम सिंग मार्गावर मागील आठ महिन्यांपासून गटारातील सांडपाणी साठत होते. यासंदर्भात रोबोटिक्स इंजिनियर असणाऱ्या तरुण भल्ला यांनी प्रशासनाकडे तक्रार करुन ही समस्या सोडवण्याची मागणी केली. अनेकदा तक्रार करुनही तरुण यांच्या तक्रारीकडे प्रशासनाने फारसे लक्ष दिले नाही. या रस्त्यावर असणाऱ्या अनेक कार्यालयांनी केलेल्या तक्रारीकडेही प्रशासनाने दूर्लक्ष केले. भल्ला आणि त्यांच्यासारख्या अनेक कर्मचारी चक्क गमबूट घालून या रस्त्यावरून ऑफिसला चालत जात असत. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दुकानदारांनाही या सांडपाण्याचा चांगलाच फटका बसला. या रस्त्यावरील दूर्गंधी येणारे पाणी आणि अस्वच्छता यामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी झाली. याच रस्त्यावरुन जात असताना एकदा भल्ला यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याच परिसरातील नागरिकांना स्वच्छतागृह बांधून दिल्याची जाहिरात करणारे बॅनर दिसले. हे बॅनर पाहून भल्ला यांना राग आला मात्र त्याच वेळी या बॅनरवरुन त्यांना ही समस्या सोडवण्यासाठी एक कल्पना सुचली. प्रशासन लक्ष देत नाही तर आपण आपल्या पद्धतीने सांडपाणी साठण्याची ही समस्या सोडवण्याचा निर्णय भल्ला यांनी घेतला.
नेते मंडळी त्यांच्या छोट्या छोट्या कामांची जाहिरातबाजी करण्यासाठी बॅनर्स लावू शकतात तर आमच्या या मोठ्या समस्येसाठी मी बॅनर लावण्याचा निर्णय घेतल्याचे बल्ला ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाले. भल्ला यांनी दिल्लीत सत्तेमध्ये असणाऱ्या आम आदमी पार्टी, केंद्रात सत्ते असणारी भारतीय जनता पार्टी आणि प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या नावाचे तीन बॅनर्स छापून घेतले. या बॅनवर संबंधित पक्षाच्या नेत्यांचे फोटो आणि त्याच्या बाजूला, ‘तुम मुझे वोट दो, मैं तुम्हें डेंगू, मलेरिया और कीचड़ दूंगा’ असं वाक्य लिहिली होते.
ज्या रस्त्यावर गटाराचे पाणी साठायचे त्याच सतगुरु राम सिंग मार्गावर त्यांनी हे तिन्ही बॅनर्स लावून ‘गटाराचे पाणी असणाऱ्या तलावाचे उद्घाटन’ अशा नावाखाली या बॅनर्सच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाची आमंत्रणे त्यांनी या रस्त्यावर कार्यालये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठवली तसेच या रस्त्यावरून जाणाऱ्यांना लाडूंचे वाटप करुन या बॅनर्सचे उद्घाटनही केले.
आश्चर्य म्हणजे भल्ला यांच्या या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला स्थानिक दुकानदारांनी आणि तेथील कार्यलयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. भल्ला यांच्या ११ वर्षाच्या मुलीने रिबीन कापून या सोहळ्याचे उद्घाटन केले. ‘आधी माझी मुलगी चिखलात उतरायला घाबरत होती. मात्र चिखल साफ करायचा तर चिखलात उतरावे लागेल असं मी तिला सांगितल्यावर ती तयार झाली,’ असं भल्ला यांनी सांगितले.
या उद्घाटन सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ दिल्लीमध्ये व्हायरल झाले. हे फोटो व्हायरल होऊ लागल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याची पहाणी करण्यासाठी आले. पहाणी करुन झाल्यानंतर काही तासातच सफाई कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी हा रस्ता स्वच्छ केला. भल्ला यांनी आयोजित केलेला उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये अर्धा किलोमीटर लांबीचा हा रस्ता चकाचक झाला. त्यानंतर भल्ला यांनी हे बॅनर्स काढून टाकले.
‘प्रशासनाकडे यंत्रणा होती पण त्यांना काम करण्याची इच्छाशक्ती नव्हती. जेव्हा बॅनरबाजीच्या माध्यमातून त्यांची लाज काढण्यात आली तेव्हा त्यांना जाग आली. मला हिंसा आवडत नाही. मला कोणत्याही अधिकाऱ्याला या कामासाठी लाच द्यायची नव्हती. सामान्य माणूस म्हणून माझ्याप्रमाणेच त्रास सहन कराव्या लागणाऱ्या लोकांचा पाठिंबा हीच माझी ताकद होती,’ असं भल्ला म्हणाले.
एक सामान्य नागरिक काय करु शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.