Delhi MCD Polls Counting Result 2022 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार हे काही क्षणांत स्पष्ट होणार आहे. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज (७ डिसेंबर) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलच्या निकालात आप पक्षाला स्पष्ट बहुमत देण्यात आले होते. मागील १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आप भाजपाची ही सत्ता खालसा करणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
रविवारी ४ डिसेंबर रोजी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत ५०.४७ टक्के मतदान झाले. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत २५० प्रभागांमध्ये एकूण १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच दिल्ली पालिकेवर कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत १.४५ कोटी मतदार आहेत.
हेही वाचा >>>हैदराबादमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १८ जणांना अटक; तब्बल १४०० महिलांची तस्करी केल्याचा आरोप!
दिल्ली पालिका भाजपासाठी महत्त्वाची
दिल्ली महापालिका भाजपासाठी राजकीय दृष्टीकोनातून खूप महत्त्वाची आहे. भाजपाची दिल्ली पालिकेवर मागील १५ वर्षांपासून सत्ता आहे. त्यामुळे यावेळीही ही सत्ता कायम राखण्याचे भाजपासमोर आव्हान आहे. तर आप पक्षाने आपले शिक्षण धोरण, मोफत वीज, आरोग्य सुविधा या मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.