आज दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, त्यापूर्वीच आप आणि भाजपा नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे बघायला मिळालं. नामनिर्देशित खासदारांना आधी शपथ देण्याच्या निर्णयावरून हा गोंधळ झाला. नियामानुसार आधी निवडून आलेल्या नगरसेवकांना शपथ देणे बंधनकार आहे. मात्र, सभापतींकडून नियमांचे उल्लंघन होत असून आधी नामनिर्देशित खासदारांना आधी शपथ दिली जात असल्याचा आरोप यावेळी आम आदमी पक्षाकडून करण्यात आला.
हेही वाचा – Rewa Plane Crash: मंदिराच्या कळसाला धडकून विमानाचा अपघात; एका पायलटचा मृत्यू, दुसरा जखमी
नेमकं काय घडलं?
डिसेंबर २०२२ मध्ये दिल्ली महापालिकेची निवडणूक पार पडली. या निडणुकीत आम आदमी पक्षाला बहूमत मिळाले होते. दरम्यान आज (६ जानेवारी) सकाळी ११ वाजता महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, त्यापूर्वी सभापतींनी नामनिर्देशित खासदारांना आधी शपथ देण्याचा निर्णय घेतला. यावरून आप आदमी पक्षाने आक्षेप घेत घोषणाबाजी सुरू केली. यावेळी त्यांची भाजपाच्या नगरसेवकांबरोबर शाद्बिक वाद झाल्याचेही बघायला मिळालं.
याबाबत बोलताना भाजपा नेते मनोज तिवारी यांनी आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली. सभागृहात बहुमत मिळूनही आम आदमी पक्षाला महापौर निवडणुकीत विजयाची खात्री नाही. त्यामुळे हा गोंधळ जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर आप नेते संजय सिंह यांनीही मनोज तिवारी यांना प्रत्युत्तर दिलं. भाजपाकडून संविधानिक मूल्यांचे उल्लंघन केले जात असून निवडणूक प्रक्रियेची चेष्टा केली जात असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसने आप आणि भाजप या दोघांनाही पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायला निवडून दिले असून आम्ही निवडणुकीदरम्यान ‘वॉकआउट’ करू, अशी माहिती दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष चौधरी अनिल कुमार यांनी दिली.