दिल्लीतील इंद्रलोक मेट्रो स्थानकात रिना नावाच्या महिलेचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मागच्या गुरुवारी (दि. १४ डिसेंबर) रिना आपल्या १० वर्षांच्या मुलासह माहेरी जात होती. नागलोई मेट्रो स्थानकातून तिने प्रवासाला सुरुवात केली आणि इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर उतरली. तिथून त्यांना दुसरी मेट्रो पकडायची होती. मात्र मेट्रोतून उतरताना तिच्या साडीचा पदर मेट्रोच्या दरवाजात अडकला आणि मेट्रो चालू लागली. काही कळण्याच्या आतच ती मेट्रोसह दूरपर्यंत फरफटत गेली. या दरम्यान प्लॅटफॉर्मवर आधी उतरलेल्या तिच्या १० वर्षांच्या मुलाने आरडाओरड करून मदतीसाठी याचना केली. मात्र मेट्रोचा दरवाजा उघडला गेला नाही. फरफटत पुढे गेल्यानंतर प्लॅटफॉर्मच्या शेवटी असलेल्या गेटला आदळून रिना मेट्रो ट्रॅकवर जाऊन पडली. या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर तिला सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी (दि. १६ डिसेंबर) तिचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आली.
हे वाचा >> मेट्रोच्या दरवाजात साडी अडकल्याने महिला फरफटत गेली; दोन मुलांच्या एकल मातेचा करुण अंत
मी मागे पळत राहिलो आणि…
या घटनेचा साक्षीदार असलेला १० वर्षांचा हितेन हादरून गेला आहे. आईच्या मृत्यूनंतर त्याने घडलेला प्रसंग कथन केला. आज तकने दिलेल्या बातमीनुसार हितेन म्हणाला की, आम्ही आजीच्या घरी एका लग्नासाठी निघालो होतो. १३ वर्षांची माझी बहिण रिया घरीच थांबली होती. आम्ही इंद्रलोक स्थानकात पोहोचल्यांतर ही दुर्घटना घडली. आईची साडी मेट्रोच्या दारात फसल्यामुळे ती फरफटत जात होती. मी मागे पळत होतो, पण तिच्यापर्यंत पोहचू शकलो नाही. मेट्रोही थांबली नाही.
हितेनने पुढे सांगितले की, मेट्रोसह आई जेव्हा प्लॅटफॉर्मच्या शेवटाला फरफटत गेली, तेव्हा तिथे असलेल्या गेटला आदळून ती ट्रॅकवर पडली. आईला वाचविण्यासाठी मीही ट्रॅकवरून पळत सुटलो. तेवढ्यात मेट्रोचे कर्मचारी आले आणि त्यांनी आईला रुग्णालयात दाखल केले. यावेळी दोन ते तीन रुग्णालयांनी आम्हाला रुग्णालयात प्रवेश दिला नाही. अनेक रुग्णालयांनी नकार दिल्यानंतर आईला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा आई कोमातच होती.
हे वाचा >> दिल्ली मेट्रोमध्ये कपलचा खुलेआम रोमान्स; Kiss करतानाचा Video झाला व्हायरल
दोन्ही मुलांसमोर आता भवितव्याचा प्रश्न
रिनाच्या पतीचे २०१४ मध्ये निधन झाले होते. तेव्हापासून ती नांगलोई येथे भाजी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. तिच्या पश्चात १० वर्षांचा मुलगा हितेन आणि १३ वर्षांची मुलगी रिया असा परिवार आहे. दोन्ही मुलांचे ती एकटीच पालनपोषण करत होती. तिच्या मृत्यूमुळे दोन्ही मुलांवर आभाळ कोसळले आहे.
आणखी वाचा >> VIDEO : मेट्रोचं दार बंद होणार अन् चोराने डाव साधला! क्षणात हिसकावला मोबाईल; बिचारा तरुण पाहातच राहिला
मेट्रोकडून भरपाईची मागणी
दरम्यान, दिल्ली मेट्रो प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे. दरवाजा उघडला असता तर रिनाचा जीव वाचला असता, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दोन्ही मुलांवरुन आता पालकांचे छत्र हरविले आहे. यापुढे जगायचे कसे? असा कठीण प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासायला घेतले आहे.