दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आम आदमी पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते तुरुंगात असताना आता पक्षाला गळती लागली आहे. दिल्लीच्या पटेल नगरचे आमदार राजकुमार आनंद यांनी नुकताच मंत्रिपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजकुमार आनंद यांनी आम आदमी पार्टीला रामराम केल्यानंतर त्यांनी ‘आप’च्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत, तसेच पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते म्हणाले, पक्षाने भ्रष्टाचार करण्यासाठी काही धोरणं बनवली आहेत, मी या धोरणांशी सहमत नाही. म्हणूनच मी आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं होतं. त्याच्याअगोदर ईडीने राजकुमार आनंद यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. यासह ईडीने राजकुमार आनंद यांच्याशी संबंधित ९ ठिकाणी छापेमारी केली होती. राजकुमार आनंद यांच्यावर हवाला व्यवहारात सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. ही छापेमारी सीमाशुल्क प्रकरणाशी संबंधित असल्याचं सागितलं जात होतं.
राजकुमार आनंद हे २०२० मध्ये पहिल्यांदाच दिल्लीतल्या पटेल नगर मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यांच्याआधी त्यांच्या पत्नी वीणा आनंद या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. दिल्ली सरकारमधील माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्याजागी राजकुमार आनंद यांचा केजरीवाल यांच्या तिसऱ्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला होता. दिल्लीत आयोजित एका बौद्ध संमेलनात हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं होतं. राजेंद्र पाल गौतम त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यानंतर राजेंद्र पाल गौतम यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं आणि त्यांच्या जागी राजकुमार आनंद यांची मंत्रिपदी वर्णी लागली होती.
हे ही वाचा >> मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
अटकेला आव्हान देणारी केजरीवालांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीने अटक केली होती. यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांची १४ दिवसांच्या कोठडीत रवानगी केली होती. केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात आहेत. अटकेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर