दोन दिवसांपूर्वी देशाची राजधानी दिल्ली एका निर्घृण हत्येनं हादरली. एका २० वर्षीय युवकानं १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची २० वेळा भोसकून हत्या केली. ही मुलगी गतप्राण झाल्यानंतरही त्यानं बाजूचा दगड उचलून तिच्या डोक्यात घातला. त्यानंतर पुन्हा चाकूनं तिच्या डोक्यावर वार केले. हा तरुण या मुलीचा प्रियकर असल्याचं सांगितलं जात आहे. या भयानक प्रकाराचं सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्लीत खळबळ माजली. देशभर हळहळ व्यक्त केली गेली. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, आता भर न्यायालयात या विकृतानं आपल्याला या प्रकाराचा अजिबात पश्चात्ताप होत नसल्याचं म्हटलं आहे!
नेमकं घडलं काय?
रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या एका गल्लीत साहिल नावाच्या या विकृतानं एका १६ वर्षांच्या मुलीची २० वेळा चाकूनं भोसकून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी आसपास लोक ये-जा करताना सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहेत. पण त्यातल्या कुणीही त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. चाकूने भोसकल्यानंतर त्यानं बाजूचाच इमारत बांधकामाचा मोठा दगड तिच्या डोक्यात टाकला. एवढ्यानं समाधान न झाल्यामुळे त्यानं पुन्हा तिच्या मृतदेहाला चाकूनं भोसकलं. तिच्या मृतदेहाला लाथा मारत हा विकृत घटनास्थळावरून निघून गेला.
हा प्रकार उघड झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने आरोपीच्या शोधासाठी सहा पथकं नियुक्त केली. काही तासांच्या आत त्याला बुलंदशहरमधून अटक करण्यात आली. तो त्याच्या नातेवाईकांच्या घरी लपला होता.
रागातून केली हत्या!
दरम्यान, पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या विकृताचे मृत अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. पण गेल्या काही दिवसांपासून तिनं त्याच्यापासून लांब राहायला सुरुवात केली होती. नात्याला नकार दिला होता. यामुळे त्या विकृताचा संताप अनावर झाला. या मुलीनं त्याला खोटी पिस्तुल दाखवून लांब राहण्यासाठी धमकावलंही होतं अशी माहितीही समोर आली आहे. रविवारी दारुच्या नशेत या आरोपीनं तिला गाठलं आणि तिची निर्घृण हत्या केली.
२० दिवसांपूर्वीच खरेदी केला होता चाकू
दरम्यान, आरोपीनं २० दिवसांपूर्वीच या मुलीची हत्या करण्यासाठी चाकू खरेदी केला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोपी साहिलनं मुलीची हत्या नियोजनपूर्वक किंवा ठरवून केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात दिल्ली पोलीस अधिक तपास करत असून सध्या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.